esakal | Video : काय म्हणता? आंतरराज्यीय सीमेवर खंदक!
sakal

बोलून बातमी शोधा

khandak

अवैध दारूतस्करी -चोरीच्या तांदळाची वाहतूक आणि कोरोना बाधित प्रवाशांना रोखण्यासाठी तेलंगणा सरकारने चक्क आंतरराज्य मार्गच खोदून काढला आहे.. तेलंगणा सरकारची अरेरावी विविध घटनांमधून सतत पुढे येत असते. ताजा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत घडलाय.

Video : काय म्हणता? आंतरराज्यीय सीमेवर खंदक!

sakal_logo
By
निलेश झाडे

धाबा (चंद्रपूर) :  तस्करीला आळा घालण्यासाठी नाकाबंदी केली जाते. पोलिस तैनात केले जातात. चौकी स्थापली जाते. गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली जाते. मात्र, तस्करीला आळा घालण्यासाठी खंदक खोदण्याचा हा नवा विचित्र प्रकार पुढे आला आहे.

अवैध दारूतस्करी -चोरीच्या तांदळाची वाहतूक आणि कोरोना बाधित प्रवाशांना रोखण्यासाठी तेलंगणा सरकारने चक्क आंतरराज्य मार्गच खोदून काढला आहे.. तेलंगणा सरकारची अरेरावी विविध घटनांमधून सतत पुढे येत असते. ताजा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत घडलाय.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वर्धा नदीच्या घाटावर पुलाची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्राच्या सा. बां. विभागाने भला थोरला पूल बांधून दोन राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या दळणवळणाची उत्तम सोय केली. मात्र, आता तेलंगणा सरकारने या मूळ भावनेलाच सुरुंग लावत आंतरराज्य महामार्ग खोदून नागरिकांची मूलभूत सुविधा हिरावून घेतली आहे.

गेली काही वर्षे तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ आणि दारू सीमावर्ती भागात येवू लागली आहे. हे रोखण्यासाठी पोलिस चौकी लावली गेली, पाळत ठेवली गेली. मात्र, त्यात अपयश आले आहे. या प्रकाराला वैतागलेल्या तेलंगणा राज्यातील सिरपूर प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील मार्गच आरपार खोदून काढला. महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणा-या पोडसा पुलाजवळ हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा - अड्याळकर कुटुंबावर शोककळा : वडिलांपाठोपाठ मुलाचेही कोरोनाने निधन

सीमावर्ती भागातील नागरिक विविध कामे घेऊन तेलंगणा राज्यातील सिरपूर  गाठतात. टाळेबंदीत राज्याची सीमा बंद होती. नुकतीच सीमा खुली करण्यात आल्याने या मार्गाने ये-जा सुरू झाली होती. आता कोरोना संकटकाळी रुग्ण रोखण्यासाठी हा फंडा वापरला गेला का, अशीही शंका व्यक्त होत आहे. तेलंगणा राज्याच्या या कृतीने सीमावर्ती  भागात संताप व्यक्त केला जात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार