अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलगी अन् दोन महिलांचा विनयभंग, गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे
Sunday, 18 October 2020

पीडितेचे आईवडील कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्याचवेळी संशयित आरोपी सुभाष माहुरे याने तिच्या घरात घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केले. बळजबरीचा प्रयत्न केला. संशयित सुभाषचा हेतू तिच्या लक्षात आला.

अमरावती : एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तरुणाने तिची छेड काढली. तरुणीने आरडाओरड करताच त्याने पळ काढला. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील श्रमजीवी लोकवस्तीत ही घटना शुकवारी (ता. 16) घडली असून याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेचे आईवडील कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्याचवेळी संशयित आरोपी सुभाष माहुरे याने तिच्या घरात घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केले. बळजबरीचा प्रयत्न केला. संशयित सुभाषचा हेतू तिच्या लक्षात आला. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केली. आपण पकडले जाऊ या भीतीमुळे त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. पीडितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सुभाषविरुद्ध विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सुभाषला अटक केली. 

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

दुसरी घटनाही राजापेठ हद्दीतील एका खासगी रुग्णालयात घडली. पीडित महिला (वय 38) येथे काम करायची. संशयित आरोपी विकास ठाकरे (वय 38) व अमित अलोणे (वय 30) यांनी तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्यापैकी विकासने तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. त्याच्या मागणीला अमितने सहकार्य केले, असा आरोप पीडितेने दाखल तक्रारीत केला. याप्रकरणी राजापेठ ठाण्यात संशयित आरोपी विकास व अमित विरुद्ध विनयभंगासह अ‌ॅट्रॉसिटी अ‌ॅक्‍टन्वये गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक करण्यात आली. विनयभंगाच्या गुन्ह्यातील तिघांनाही शनिवारी (ता. 17) न्यायालयात हजर केले असता त्यांना  न्यायालयीन कोठडी सुनावली.

रुग्णालयात काम करीत असताना दोघांनी मागणी करून असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप तक्रारीत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
-किशोर सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक राजापेठ ठाणे.

हेही वाचा - आई- वडील नाही मुलांचे बना मित्र! जाणून घ्या...

विवाहितेची छेड -
जिल्ह्यातील कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत एका गावात विवाहितेला (वय 28) एकटी बघून संशयित आरोपी दिलीप काळे, गजानन करताळे, वामन सावंत, जगन शिंदे यांनी बळजबरीचा प्रयत्न केला. पीडितेने वाचवा..वाचवा... ओरडताच चौघांनी पळ काढला. विवाहितेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: molestation of one minor girl and two woman in amravati