ॲम्फन'ने रोखला मॉन्सूनचा मार्ग...धो-धो पावसासाठी करावी लागू शकते या तारखेची प्रतीक्षा

monsoon in akola.jpg
monsoon in akola.jpg

अकोला : यावर्षी मॉन्सून सामान्य व वेळेअगोदरच पोहोचणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार मॉन्सूननचा प्रवासही सुरू झाला होता. परंतु अचानक तयार झालेल्या 'ॲम्फन' वादळाने मॉन्सूनचा प्रवास मार्ग रोखला. त्यामुळे आता मॉन्सूनच्या आगमनासाठी व धो-धो पावसासाठी 10 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

गेल्या काही वर्षांमध्ये ऋतूचक्रामध्ये अमुलाग्र बदल झाला असून, या बदलासाठी वाढलेले प्रदूषण कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. ऋतूचक्रामध्ये झालेल्या बदलाचा सर्वाधिक परिणाम पावसाळ्यावर झाला आहे. दरवर्षी पावसाळा लांबत चालला असून, पावसाचे दिवस कमी झाले आहेत. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे नुकसान वाढले असून, भूजल पातळी सुद्धा खालावलेली आहे.

यावर्षी मात्र दोन ते तीन महिन्यापासून जगभरात अनेक दिशांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन केल्याने प्रदूषण झपाट्याने घटले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हवामानावर व पर्यायाने ऋतूचक्रावर होणार असल्याचे हवामान अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून या वर्षी मॉन्सून सामान्य राहणार असून, योग्यवेळी आगमनाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. 

त्यानुसारच मॉन्सूनची निर्मिती व मार्गक्रमण सुरु झाला होता आणि 1 किंवा 2 मे पर्यंतच मॉन्सून अकोल्यासह विदर्भात धडकण्याची शक्यता वर्तविली जात होती. समुद्रामध्ये अचानक 'ॲम्फन' वादळाची निर्मिती होऊन त्याच्या प्रभावाने मॉन्सूनचा प्रवास मंदावला. त्यामुळे आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

पावसाचे ढग निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावली
सध्या पावसाची शक्यता कमी असून, तापमान वाढू शकते. मॉन्सून सध्या विषुववृत्तासमोर असून, श्रीलंका-अंदमानच्या मध्ये घोंगावत आहे. मध्यंतरी 'ॲम्फन' वादळाची निर्मिती झाल्याने आजुबाजुची आद्रता ओढून घेतली गेली व त्याचा परिणाम होऊन पावसाचे ढग निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावली. आता हवेच्या दाबातील तफावत निर्माण व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे यंदाही आपल्याकडे जोरदार मॉन्सूनचे आगमन 10 ते 15 जूनपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

वळिवाच्या पावसाची दांडी
एरव्ही मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये वळिवाचा पाऊस हजेरी लावतो आणि त्यानंतर खरिपाच्या तयारीला सुरुवात होते. मात्र गेल्यावर्षी आणि यंदाही वळिवाच्या पावसाची दांडी मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com