दीड महिन्यात पोलिसांची धाव कुठपर्यंत?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • मृताची ओळख पटविण्यात अपयश
  • अरोली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कोदामेंढी (जि.नागपूर): अकरा ऑक्‍टोबर रोजी सकाळच्या सुमारास रामटेक-भंडारा मार्गावर इंदोरा गावानजीक पायलीच्या आतमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात चार खुनाच्या गुन्ह्याची नोंद आहे. दीड महिना लोटूनही मृताची ओळख पटली नसल्याने अरोली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मृत व्यक्ती कोण होती आणि त्याला कसे मारले, त्याबरोबरच पायलीच्या आतमध्ये का टाकले, याबाबत अद्याप कसलीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. 40 ते 45 वयोगटातील व्यक्तीच्या मृतदेहाच्या उजव्या हातावर मोराचे चित्र गोंदवलेले, उजव्या हातामध्ये काळ्या रंगाचा रबराचा कडा घातलेला आणि कंबरेखाली केवळ चड्डी घातलेली व मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. राज्यभरात कोणत्याही पोलिस ठाण्यात अशा व्यक्तीबाबत हरविल्याची नोंद आढळून आलेली नाही. त्यामुळे मृतदेह नेमका कुणाचा असावा आणि त्याला उघडे करून पायलीच्या आतमध्ये का टाकून ठेवले असावे, असे एक ना अनेक सवाल निर्माण झाले आहेत.

शवविच्छेदन अहवालात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने डॉक्‍टरांना कसल्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे "व्हिसेरा' काढून डीएनएकरिता पाठविण्यात आले असल्याचे माहितीस आहे. पोलिसांना त्या रात्री या मार्गाने पाच ते सात राजस्थानचा नंबर असलेल्या गाड्याची वाहतूक झाल्याची माहिती लागली आहे. पोलिसांनी परिसरातील आणि शिवारातील नागरिक आणि मजुरांची चौकशी करून घेतली. मात्र, काहीही सुगावा लागला नाही. हातावर मोराचे चित्र गोंदवलेले असल्याने मृत राजस्थान किंवा मध्य प्रदेश राज्यातील असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. राजस्थानमध्ये किंवा मध्य प्रदेशात वनवासी नागरिक असे हातावर गोंदण करीत असतात. त्यामुळे आता तपासाची चक्रे परराज्यांत सुरू होतील.

आम्ही त्या रात्रीच्या गाड्यांचे नंबर घेतले आहेत. तपासाकरिता राजस्थानला जाण्याकरिता पोलिस अधीक्षक यांच्याकडे परवानगी टाकली आहे. राज्यात अशी व्यक्ती हरविल्याची कुठेही नोंद आढळून आली नाही. तपासचक्रे सुरू आहेत.

-विवेक सोनवणे, ठाणेदार, अरोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In a month and a half, how far?

फोटो गॅलरी