हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त, धावत्या रेल्वेतून पडून आईसह बाळाचा मृत्यू

Bhandara Train Accident
Bhandara Train Accidentesakal

निलज बु. (जि. भंडारा) : धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने आई आणि मुलगा नदीवरील पुलावरून खाली कोसळले. यात १६ महिन्याच्या मुलाचा नदीतील पाण्यात बुडून तर आईचा नदीवरील लोखंडी पुलावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील माडगी रेल्वे पुलावर (Madagi Railway Bridge) आज सकाळी उघडकीस आली. दोघांच्या मृत्यूमुळे हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्धवस्त झालं.

पूजा ईशान रामटेके (२७) आणि १६ महिन्याचा अथर्व ईशान रामटेके रा. प्लॉट नंबर ७१ टेकानाका आवडे नगर, नारी रोड नागपूर असे मृतक आई आणि मुलाचे नाव आहे. इशांत तुकडूदास रामटेके हे मध्यप्रदेशातील रीवा येथील सैनिकी शाळेत शिक्षक आहेत. ईशांत रामटेके हे त्यांची पत्नी पूजा आणि अथर्व यांच्यासह रविवारी नागपूर येथील इतवारा रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशातील रीवाकडे जाण्यासाठी ट्रेन नंबर ११७५३ ने एसी बोगीतून प्रवास करीत होते.

बाळाचे तोंड धुवायला दरवाज्याजवळ गेली अन् ...

प्रवासादरम्यान रात्री ७.३० वाजताच्या सुमारास रामटेके कुटुंबीयांनी रेल्वेत जेवण केले. त्यानंतर पूजा यांनी मुलगा जेवण झाल्यानंतर अथर्वचे तोंड धुण्यासाठी बोगीच्या दरवाजाजवळील वॉश बेसिंगकडे गेली. धावत्या रेल्वेचे दार सुरू असल्याने कदाचित त्यांचा तोल गेला असावा आणि पूजा आणि त्यांचा मुलगा अथर्व हे तुमसर तालुक्यातून जाणाऱ्या माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातील रेल्वेच्या पुलावरून खाली कोसळले. मुलगा नदीपात्रातील पाण्यात तर, पूजा या नदीवरील रेल्वेच्या लोखंडी पूलाच्या कठड्यावर कोसळला.

मृतदेह दिसताच पतीनं फोडला हंबरडा -

तिकडे दहा-पंधरा मिनिटं होऊनही पत्नी आणि मुलगा परत न आल्याने चिंताग्रस्त पती ईशान याने रेल्वेचे टॉयलेट बाथरूम सह अन्य बोगीची देखील तपासणी केली. दरम्यान त्यांनी याची माहिती रेल्वेचे टीटी यांना देऊन तपासणी केली. रात्री ९ वाजताच्या सुमारास ट्रेन गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर याची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली. गोंदिया रेल्वे स्थानकावर सुमारे तासभर रेल्वे थांबवून दोन्ही बेपत्ता मायलेकांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाही. दरम्यान याची माहिती ईशान रामटेके याने त्याच्या सासुरवाडीला दिली.

सकाळी ईशान रामटेके हे नातेवाईकांसह रेल्वेने प्रवास केलेल्या मार्गावर शोधात निघाले असता माडगी रेल्वे पुलावर पत्नीचा मृतदेह तर मुलाचा नदीपात्रातील पाण्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती करडी पोलिस ठाण्याला देण्यात आली. ठाणेदार निलेश वाजे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्त केले. याप्रकरणी करडी पोलिसांनी झिरोची कायमी करून मर्ग दाखल केला असून अधिक तपासासाठी प्रकरण गोंदिया रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com