सासू हवी तर अशी, सून नांदायला यावी म्हणून टाकली पिठात जडीबुटी! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

वंदना दिघोरे ही सासरी पटत नसल्यामुळे तीन वर्षांपासून माहेरी आंबोडा येथे येऊन राहत आहे. ती परत नांदायला यावी म्हणून सासू शोभाबाई दिघोरे आणि सासरा अंकुश दिघोरे हे सोमवारी (ता. 15) मनधरणी करण्यासाठी आंबोडा येथे आले होते.

महागाव (जि. यवतमाळ) : घरगुती भांडणामुळे तीन वर्षांपासून सून माहेरी जाऊन बसली. ती परत नांदायला यावी म्हणून सासूने चक्क सुनेच्या माहेरी येऊन तिच्या घरातील पिठात वशीकरणासाठी जडीबुटी टाकली. या पिठाची भाकरी खाल्ली तर सुनेचे मत परिवर्तन होऊन ती नांदायला येईल, हा हेतू या मागे असल्याचे कळते. परंतु; पिठात टाकलेली जडीबुटी होती की विष याबाबत संभ्रम असल्याने हे प्रकरण महागाव पोलीस ठाण्यात नोंद झाले. आता यात काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे. 

या प्रकरणाची पृष्ठभूमी असी की, अंबोडा येथील वंदना बोरकर हिचा विवाह मुकिंदपूर येथील प्रशांत दिघोरे याच्यासोबत झाला. विशेष म्हणजे प्रशांतची बहीण आशा हिचा विवाह वंदनाचा भाऊ जीवन बोरकर याच्याशी जुळवण्यात आला. म्हणजे हे नातेसंबंध साटेलोटे आहे. वंदना दिघोरे ही सासरी पटत नसल्यामुळे तीन वर्षांपासून माहेरी आंबोडा येथे येऊन राहत आहे. ती परत नांदायला यावी म्हणून सासू शोभाबाई दिघोरे आणि सासरा अंकुश दिघोरे हे सोमवारी (ता. 15) मनधरणी करण्यासाठी आंबोडा येथे आले होते. परंतु सासू शोभाबाई हिने अंधश्रद्धेपोटी मांत्रिकाकडून जडीबुटी आणली. भाकरीच्या पिठामध्ये जडीबुटी टाकून ती वंदनाला खायला घातली.

अवश्य वाचा- व्वा क्या बात है! खासदार नवनीत राणांनी केली चक्क शेतात पेरणी...

शोभाबाईच्या मुलीनेच फोडले बिंग 

या जडीबुटीमुळे वंदनाचे मत परिवर्तन होऊन ती नांदायला येईल, अशी तिची समजूत होती. सर्वांचे लक्ष चुकवून पिठात जडीबुटी टाकताना आशा म्हणजेच दस्तूरखुद्द शोभाबाईच्या मुलीनेच पाहिले होते. तिने आपल्या आईकडे याबाबत विचारणा केली असता ही जडीबुटी असून याची माहिती कोणाला देऊ नको, असे शोभाबाईने मुलगी आशाला सांगितले. परंतु; आशाने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये आले. तूर्तास या प्रकरणी पोलीस तपास करीत असून नेमका प्रकार उघड झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. 

जडीबुटी पिठात टाकल्याबद्दलची तक्रार महागाव पोलिस स्टेशनला आली आहे. पिठामध्ये कोणती जडीबुटी टाकली, कोणी दिली याचे बयान घेऊन ते पीठ आम्ही पोलीस स्टेशनला जमा केले आहे. ते पीठ तपासणीसाठी पाठवणार आहोत त्याचा रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- ठाणेदार डी.के. राठोड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother-in-law mixed herbs in the floor for that daughter-in-law will come back