
शनिवारी मध्यरात्रीनंतर झोपलेल्या अवस्थेत असलेल्या भंडारा जिल्हा रुग्णालयात जळीत अग्निकांड घडले. येथील हे वास्तव येथील एका रुग्णवाहिकेच्या चालकाने बघितले. हा सारा अनुभव कथन करताना त्याच्या डोळ्यात पाणी आले
भंडारा ः जिकडे बघावे तिकडे काळा धुरच धूर दिसत होता, तर अतिदक्षता विभागाचे दार उघडताच साऱ्या परिसरात धूर झाला होता. ज्वाळा दिसत नसल्या तर आग मात्र या रुग्णालयात धुमसत होती. ज्या मायबापांची लेकरं या युनिटमध्ये दाखल होती, त्या माता लेकरांच्या आकांताने आउट बॉर्न युनिटच्या दिशेने धावत येत होत्या. मात्र त्या पोहचण्यापूर्वीच चिमुकल्यांना आगीने कवेत घेतले होते. लेकराच्या जीवाच्या आकांताने त्या माता ओरडत होत्या.' वाचवा ... हो ... कुणीतरी आमच्या लेकरांना वाचवा.... असे म्हणत कोणतीही पर्वा न करता धुरांनी काळवंडलेल्या त्या छकुल्यांच्या डोक्यावर पदर टाकून त्यांना कवटाळून त्या माता आक्रोश करीत होत्या.
शनिवारी मध्यरात्रीनंतर झोपलेल्या अवस्थेत असलेल्या भंडारा जिल्हा रुग्णालयात जळीत अग्निकांड घडले. येथील हे वास्तव येथील एका रुग्णवाहिकेच्या चालकाने बघितले. हा सारा अनुभव कथन करताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो गहिवरला. गावखेड्यातील मातापित्यांची ही दोन, तीन दिवसांची ही लेकरं. लग्नानंतर त्यांच्या इवलासा संसारात आनंदाचे क्षण घेऊन ही बाळं जन्माला आली. बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचे स्वप्न या मातापित्यांनी उराशी बाळगले होते. येथील कोणी शेतमजुरांची मुलगी होती, तर कुणी मजुरी करणाराची चिमुकली.
अतिदक्षता विभागात फक्त नवजात ठेवण्यात येतात, आईवडील प्रतिक्षालयात असतात. मात्र शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर आग लागल्याची बातमी रुग्णालयाच्या आवारात पोहचताच सुसाट वेगाने रुग्णालयाच्या दिशेने या मातांनी धाव घेतली. तोपर्यंत धुराने या चिमुकल्यांचा जीव घेतला होता. सारे रुग्णालयच झोपले होते त्यावेळी मेरे बेटी को बचाओ….मेरे बेटीको बचाओ असा चीत्कार ऐकू येत होता, त्यावेळी आवारात असलेला रुग्णवाहिकेचा चालक आला. अवघ्या अर्ध्या तासात हे सारं घडलं. दुःखाने माखलेल्या या घटनेचा ऑखों देखा हाल या या रुग्णवाहिका चालकाने सांगितला. येथे घडलेल्या या घटनेमुळे येथे तैनात असलेल्या परिचारिका, काही पोलिसांनाही त्या मातापित्यांचे दुःख बघून अश्रू अनावर झाले.
बाळसे झाले नव्हते...सारेच अनामिक
जळून मृत्यू पावलेल्या या छकुल्यांचे बाळसेही झाले नव्हते. या लेकींना कोणत्या नावाने हाक मारावी हे देखील कळत नव्हते. सारेच अनामिक...मात्र नऊ महिने वाढलेल्या पोटच्या गोळ्यांना असं डोळ्यादेखत जळताना बघून या मातांच्या चीत्काराने हृदय हेलावून गेले होते.
संपादन - अथर्व महांकाळ