एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

भाग्यश्री राऊत
Saturday, 9 January 2021

एनआयसीयूकडे धाव घेतली. सर्व ऑक्सिजन सिलिंडर बंद केले. खिडक्या उघडल्या आणि बाळाला टॅगिंग करून एका हातावर चार बालकांना ठेवत बाहेर धाव घेतली.

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर यूनिटमध्ये आग लागल्याची घटना घडली. यामध्ये १० नवजात शिशूंचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. मात्र, यादरम्यान नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका सविता इखार यांची आठवण अनेकांना झाली. २०१९ मध्ये लागलेल्या आगीत त्यांनी एकावेळी चार बालक, तर दुसऱ्यावेळी पाच बालकांना हातावर घेत, तब्बल ९ नवजात शिशूंचा जीव वाचविला होता. त्यामुळे आज भंडाऱ्यातील दुर्घटनेमुळे त्यांची सर्वांना आठवण होत आहे. 

हेही वाचा - VIDEO : आई-बाप झालो म्हणून गगनात मावत नव्हता आनंद, पण...

नेमके काय घडले होते मेयोमध्ये? -
गेल्या ३१ ऑगस्ट २०१९ मध्ये इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील येथे एनआयसीयूला आग लागली होती. यावेळी सवित इखार या रात्रपाळीला कर्तव्य बजावत होत्या.  साधारण पहाटे पावणेतीनची वेळ होती. एनआयसीयूमध्ये नेहमी सतर्क राहावे लागते. तीन-तीन तासांनी बालकांना फिडींग करावे लागते.  त्यासाठी सरीता या बाहेरच्या कॉरीडोअरमध्ये आल्या. एनआयसीयूच्या प्रवेशद्वाराजवळ डीपी होती. त्याठिकाणी स्पार्कींग होताना त्यांना दिसले. मात्र, ते थोड्या वेळानी थांबेल म्हणून त्याचठिकाणी थांबून वाट पाहिली. पण, विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले. तिथेच खाली ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर ठेवले होते. रुग्णांनाही ऑक्सिजन लावले होते. त्यामुळे आग पसरण्याची जास्त भीती होती.

हेही वाचा - Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले

काय करावे हे त्यांना सूचत नव्हते. त्यावेळी त्यांनी बाहेर मदतीसाठी धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्याने कोणीच नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या वार्डातील एक परिचारिका आली. तिला आग लागली हे सांगितले अन् एनआयसीयूकडे धाव घेतली. सर्व ऑक्सिजन सिलिंडर बंद केले. खिडक्या उघडल्या आणि बाळाला टॅगिंग करून एका हातावर चार बालकांना ठेवत बाहेर धाव घेतली. दुसऱ्या वार्डात ठेवले. त्यानंतर लागलीच उरलेल्या पाच जणांना वाचविण्यासाठी धाव घेतली. पाचही जणांना एकावेळी उचलले आणि दुसऱ्या वार्डात ठेवले. त्यापैकी एकजण गंभीर होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. तत्काळ ऑक्सिजन मागवून त्या बाळाला लावले. अशारितीने परिचारिका सविता इखार यांनी सर्व बालकांना वाचविले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले गेले. आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेवेळी अनेकांना या शूर परिचारिकेची आठवण झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarita ikhar saved 9 child in indira gandhi government medical college nagpur fire 2019