दारूबंदीसाठी गडचिरोली जिल्हा महिलांनी सोडला दणाणून, केले बाजा बजाओ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

"दारू सोड, नाहीतर वाजवू ढोल' अशी तंबी देत अनोखे बाजा बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात तीनही गावांतील जवळपास 60 महिला व पुरुष सहभागी झाले होते.

धानोरा (जि. गडचिरोली) : दारूमुळे संसार उद्धवस्त होतात. पुरुष जरी दारू पित असले तरी त्याचा त्रास महिलांना होतो. म्हणून महिलांनीच दारूबंदीचे आंदोलन हाती घेतले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. गडचिरोली जिल्ह्यात अशीच घटना घडली. कुलभट्टी येथील दारूविक्री बंद व्हावी, यासाठी तालुक्‍यातील मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी या गावी जात "दारू सोड, नाहीतर वाजवू ढोल' अशी तंबी देत अनोखे बाजा बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात तीनही गावांतील जवळपास 60 महिला व पुरुष सहभागी झाले होते.

कुलभट्टी येथील दारूविक्री आजुबाजुच्या इतर गावांसाठी त्रासदायक ठरत असल्याने विक्रेत्यांनी येथे दारू गाळणे आणि विकणे कायमचे बंद करावे म्हणून महिलांनी आंदोलन केले. तालुक्‍यातील मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या गावातील दारूविक्री बंद केली आहे. ती टिकून राहण्यासाठी या दोन्ही गावांतील महिला सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पण काहीच अंतरावर असलेल्या कुलभट्टी या गावी अनेकजण दारू गाळून त्याची विक्री करतात. त्यामुळे या दोन्ही गावांतील पुरुष दारू पिण्यासाठी कुलभट्टी या गावी येतात. परिणामी हे गाव दोन्ही गावांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

येथून दारू पिऊन मुरूमगावला परत येताना आतापर्यंत अनेकांचे दुचाकीने अपघात झाले आहेत. हा प्रकार थांबण्यासाठी कुलभट्टी गावाची दारू बंद होणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी कुलभट्टी येथे दारूविक्रेत्यांविरोधात बाजा बजाओ आंदोलन छेडले.
संपूर्ण गावातून बॅड वाजवत कुलभट्टीवासीयांनो जागे व्हा, दारू विक्री बंद करा, नही चलेगी नही चलेगी, गाव मे दारू नही चलेगी, मुरूमगाव तो झॉंकी है, कुलभट्टी अभी बाकी है, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ

या आंदोलनात कुलभट्टी येथील महिला, काही पुरुष तसेच गाव पुजारी कोरेटी आणि गावाचे पाटील तुळशीराम कोरेटी सहभागी झाले होते. या गावातील दारूविक्रीमुळे इतर गावांतील दारूबंदीवर विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे येथील दारू गाळणे व विक्री बंद करण्याचे आवाहन करीत या आंदोलनात सहभागी होण्याचे लोकांनाही आवाहन केले. धानोरा तालुका मुक्तिपथ प्रेरक भास्कर कडयामी, अक्षय पेद्दीवार आणि मुक्तिपथचे जिल्हा उपसंचालक संतोष सावळकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement against liquor by women in Gadchiroli