esakal | पात्र होमगार्डनी केले डोके आपटून आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

पात्र होमगार्डनी केले डोके आपटून आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः जिल्हा समादेशकांनी पात्र ठरवलेल्या होमगार्डनी आज संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमिनीवर डोके आपटून भर पावसात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला.
सरकार तुपाशी होमगार्ड उपाशी, पुनर्भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करून सरकारच्या विरोधात नगरसेवक बंटी शेळके, अमोल देशमुख, चंद्रपाल चौकसे, गज्जू यादव, युवा कॉंग्रेस अध्यक्ष तौसिफ खान, संजय सत्यकार, रामटेकचे माजी नगराध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यात नागपूर, नरखेड, रामटेक, काटोल, हिंगणा, बुटीबोरी, नागभीड, सावनेर, उमरेड, कामठी येथील शेकडो पात्र ठरलेले होमगार्ड सहभागी झाले होते. दरम्यान, युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. पोलिस अधीक्षकांनी शिष्टमंडळाला हे प्रकरण तीन दिवसांपूर्वीच आमच्याकडे आले असल्याचे सांगून पहिल्या भरतीमध्ये धावले, आता दुसऱ्याही भरतीमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले. यावेळी पात्र होमगार्डनी बाजू मांडताना सांगितले की, आमचे वय वाढले आहे. 13 मार्चच्या भरतीमध्ये पात्र असल्याचे कळविल्याने आम्ही धावण्याचा सरावही बंद केला होता. रेशीमबाग मैदानावर प्रदर्शन लागले आहे. इतरही मैदानावर कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. तयारी कुठे करायची, असा प्रश्‍न उपस्थित केला. दरम्यान, ओला यांनी ज्यांच्या गुणात तफावत आहे त्यांची चौकशी करून पात्र उमेदवारांची यादी तातडीने जाहीर करू असे आश्‍वासन दिले. तसेच वरिष्ठांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. आंदोलनात तौसिफ खान, गज्जू यादव, चंद्रपाल चौकसे, रमेश कारेमोरे, संजय सत्यकार, रोहित खैरवार, सागर चव्हाण, प्रमोद ठाकूर, फजलूर कुरेशी, आकाश गुजर, तौसिफ अहमद, सुमित ढोलके, स्वप्निल ढोके, अजहर शेख, विजय मिश्रा सहभागी झाले होते.

loading image
go to top