ऐकले का कधी खड्डे खोदो आंदोलनाविषयी?संतप्त नागरिकांचा प्रशासनाला अल्टीमेटम, वाचा नेमके काय

gad
gad

सिरोंचा(जि. गडचिरोली) : येथील सिरोंचा-आल्लापल्ली व सिरोंचा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गावर असंख्य खड्डे पडले असून त्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा मागणी करूनही सरकार लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या आदिवासी विद्यार्थी संघाने सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून १५ दिवसांत येथील खड्डे बुजविले नाहीत, तर अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या घरासमोर खड्डे खोदो आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात आविसंने सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा-आलापल्ली व सिरोंचा- आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर मागील सहा ते सात वर्षांपासून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना त्रास होत आहे. नेहमी हे खड्‌डे बुजविण्याचे काम थातूरमातूर पद्धतीने होत असते.

आजपर्यंत कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यात आले नाहीत. परिणामी गर्भवती महिलांसह या दोन्ही महामार्गांवरून ये -जा करणाऱ्या नागरिकांसह दुचाकी ,चारचाकी व अन्य वाहनातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या समस्येची गंभीरता अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली, तरीही आजपर्यंत कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यात आले नसल्याचे नमूद केले आहे. सिरोंचा तालुक्‍यातील दोन्ही महामार्गांवर पडलेले खड्डे तत्काळ बुजविणे आवश्‍यक आहे.

हे खड्डे १५ दिवसांत न बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडत आमदार व खासदारांच्या घरापुढे खड्डे खोदण्याचा इशारा आदिवासी विद्यार्थी संघाकडून देण्यात आला आहे. निवेदन देताना आविसंचे ज्येष्ठ नेते आकुला मल्लिकार्जुन, मंदा शंकर, आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, आविसंचे सल्लागार रवी सल्लम, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जयसुधा जनगम, जिल्हा परिषद सदस्य सरिता तैनेनी, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे, सरिता पेद्दी, सुधाकर पेद्दी, जाफराबादचे ग्रामपंचायत सरपंच बापू सडमेक, महेश भंडारी, संतोष पडाला, समय्या चौधरी, सुरेश येरकरी, श्‍याम बेज्जनी, मारोती गणापूरपू, नागराजू इंगीली, अशोक हरी, अशोक इंगीली, किरण वेमुला, साई मंदा, रवी सुलतान, तिरुपती चिट्याला, लक्षण बोल्ले यांच्यासह आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

अपघात वाढले
या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची दुर्दशा झाल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथे अवजड वाहनांमधून अतिरिक्‍त भारवाहतूक होत असल्यानेही रस्त्यांची अवस्था दयनीय होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे खड्डे पाण्याने भरून असतात. त्यामुळेही वाहन असंतुलित होऊन अपघात होत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com