शिवसेना पोलिस कारवाईला घाबरत नाही; अशा का म्हणाल्या खासदार भावना गवळी?

सूरज पाटील
Thursday, 31 December 2020

शिवसेना पोलिस कारवाईला घाबरत नाही. याआधी सुद्घा न्यायासाठी आंदोलन करताना अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे यापेक्षाही कठोर पोलिस कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा खासदार गवळी यांनी दिला आहे. 

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अशा परिस्थितीत पिकविमा कंपन्यांनी बोटावर मोजण्या इतक्‍यात शेतकऱ्यांना पीकविमा दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल करण्यात आले. अशा पोलिस कारवाईला आम्ही घाबरणार नाही. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोरोनापाठोपाठ अतिवृष्टीचे संकट आले. संततधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्‍टर जमिनीवरील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने तर कहरच केला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकही परतीच्या पावसाने नष्ट झाले. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आर्थिक मदत मिळावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा काढला आहे.

अधिक वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द

जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना विमा कंपनीने केवळ नऊ हजार ७७६ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ दिला. त्यामुळे खासदार गवळी यांनी सोमवारी पीकविमा कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला. जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता गुन्हे दाखल करण्यात आले.

शिवसेना पोलिस कारवाईला घाबरत नाही. याआधी सुद्घा न्यायासाठी आंदोलन करताना अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे यापेक्षाही कठोर पोलिस कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा खासदार गवळी यांनी दिला आहे.

जाणून घ्या - जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण

नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांवर अन्याय
पीकविमा कंपनीने परिपूर्ण सर्वेक्षण केले नाही. याचा फटका आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच कृषी व विमा कंपनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समज दिली होती. तरीही नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. माझ्यावर कितीही गंभीर गुन्हे दाखल केले अथवा हातकड्या लावल्या तरीही शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही. 
- भावना गवळी,
खासदार, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Bhavna Gavli says Will not be afraid of police action Political and Farmers news