
कोरोना झाल्यानंतर कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते याची जाणीव असूनही नवनीत राणा यांनी विना मास्क धावत्या एसटीच्या दारात उभे राहून प्रवास केला. त्यामुळे त्यांचा हा प्रवास वादात सापडला आहे.
मेळघाट (जि. अमरावती): खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडू, असे सांगत धावत्या एसटीमधून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता. तसेच धावत्या बसच्या दारात उभे राहून अशी प्रतिक्रिया देणे हे कितपत योग्य आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबईत अत्याधुनिक बसेस चालतात आणि मेळघाटात जुन्या भंगार बसेस चालविल्या जातात. हा आदिवासींच्या जिवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप प्रवास होईल, अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केली.
हेही वाचा -सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून फुलविली मोसंबीची बाग, दोन एकरात वर्षाला तीन लाख उत्पन्न
राणा दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे आधी त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. मुंबईत उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोना झाल्यानंतर कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते याची जाणीव असूनही नवनीत राणा यांनी विना मास्क धावत्या एसटीच्या दारात उभे राहून प्रवास केला. त्यामुळे त्यांचा हा प्रवास वादात सापडला आहे.
हेही वाचा - अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; मंगळवारी...
दरम्यान, नवनीत राणा व रवी राणा यांनी अचलपूर येथील फिनले मिल कामगारांच्या उपोषणास भेट दिली. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. कुठल्याच परिस्थितीत फिनले मिल बंद पडू देणार नाही, असेसुद्धा ते म्हणाले.
नवनीत राणा व रवी राणा गेल्या पाच दिवसांपासून अचलपूर-मेळघाट विधानसभा संपर्क दौऱ्यावर आहेत. अचलपूर-परतवाडा परिसरातील कामगारांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असणारी ङ्किनले मिल कोरोना लॉकडाउनमुळे बंद पडलेली आहे. कामगारांना पूर्ण वेतन मिळत नाही त्यांची व कुटुंबीयांची उपासमार होत आहे. कामगारांना भेटून त्यांची आस्थेने विचारपूस केली व तेथूनच तत्काळ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याशी संपर्क साधून कामगारांना न्याय देण्याचे सुचविले. दरम्यान, लवकरच यावर तोडगा काढू, असे वचन स्मृती इराणी यांनी खासदार नवनीत राणा यांना दिले.
संपादन - भाग्यश्री राऊत