भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी दिले ‘त्या' प्रकरणावर स्पष्टीकरण; म्हणाले...

अभिजित घोरमारे
Tuesday, 11 August 2020

आम्ही राहतो त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्याने तो परिसर कंटेन्मेंट झोन झाला आहे. त्यामुळे मला तेथे जाता न आल्याने वॉशरूम वापरायला सलुनमध्ये गेलो होतो. व्डिडिओ व्हायरल करून केवळ आणि केवळ मला बदनाम करण्याचे प्रयत्न कुणीतरी करीत आहे. याबाबत भंडारा नगर परिषदेने आधीच त्या सलून मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता विदर्भ हाउसिंग कॉलनीतील लुक्स नावाच्या सलुनमध्ये दाढी, कटिंग केली होती. काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि शनिवारी दुपारपर्यंत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराबाबत ‘वॉशरुमसाठी मी सलुनमध्ये गेलो होतो’, असे स्पष्टीकरण खासदार सुनील मेंढे यांनी दिले.

रात्री उशिरा लाखांदूर येथील बैठक आटोपून मला नागपूरला जायचे होते. जाताना रात्रीच्या वेळी सलून उघडे दिसले. त्यामुळे त्या दुकानदाराला येवढ्या उशिरा दुकान उघडे कसे, याबाबत विचारणा केली. त्यावर एअरकंडीशनरची दुरुस्ती सुरू असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान मी सलुनमधील वॉशरुमचा वापर केला आणि सततच्या दौऱ्यामुळे थकवा जाणवत असल्याने तेथेच चेहऱ्यावर पाणी घेतले आणि त्याला म्हणालो की थोडं फ्रेश करून दे. येवढ्यात कुणीतरी व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. कुण्यातरी विरोधकाचे हे काम दिसते आहे, खासदार मेंढे म्हणाले.

आम्ही राहतो त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्याने तो परिसर कंटेन्मेंट झोन झाला आहे. त्यामुळे मला तेथे जाता न आल्याने वॉशरूम वापरायला सलुनमध्ये गेलो होतो. व्डिडिओ व्हायरल करून केवळ आणि केवळ मला बदनाम करण्याचे प्रयत्न कुणीतरी करीत आहे. याबाबत भंडारा नगर परिषदेने आधीच त्या सलून मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. असे असताना लोकांना भ्रमित करण्यासाठी व्हिडिओ वायरल केल्याचे खासदार मेंढे यांनी सांगितले. याबाबत कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करणार असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.

सविस्तर वाचा - खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले

नागरिकांनी केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोरोनाशी लढताना सरकारने घालून दिलेले नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. सर्वत्र लोकप्रतिनिधी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन करताना दिसतात. मात्र, भंडारा येथे खासदारांनीच कोविडच्या नियमांची ऐसीतैसी केल्यामुळे लोक संतापले होते. सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्या खासदार सुनील मेंढेंनाही शिक्षा झाली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे होते. नागरिकानी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून खासदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sunil Mendhe said he had gone to the saloon for the washroom