
अमरावती : लॉकडाऊनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या काळात महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या १० महिन्यांच्या काळात वीजबिल भरण्याचा तगादा न लावता अखंडित वीजपुरवठा केला. त्यातच अमरावती परिमंडळातील लघुदाब वर्गवारीतील ३ लाख ६ हजार ८९२ ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीजबिल भरले नसल्याने वीजदेयकापोटी त्यांच्याकडे २६० कोटी रुपये थकीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
अखंडित वीजसेवा देणारी महावितरणच आर्थिक संकटातून जात असल्याने थकबाकीदार ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील खासगी वीज वितरण कंपन्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा ऑक्टोबर २०२० पासूनच खंडित करीत आहेत.
महावितरणकडून मात्र फेब्रुवारी २०२१ पासून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. याशिवाय महावितरण ही वीजग्राहकांसारखी वीजनिर्मिती कंपन्याची एक ग्राहकच असल्याने वीजबिलाच्या सुमारे ८५ टक्के खर्च हा वीजखरेदीवर होत असतो. पण मागील दहा महिन्यांत वाढलेल्या थकबाकीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीने भविष्यात महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
परिमंडळातील एप्रिल २०२० नंतर एकदाही बिल न भरणाऱ्या विविध वर्गवारीतील ग्राहकांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ६२० ग्राहक असून त्यांच्याकडे १६५ कोटी व यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख १७ हजार २७२ ग्राहकांकडे ९५ कोटींची वीजदेयके थकली आहेत.
वीज ग्राहक हे महावितरणचे दैवत असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. हेल्प डेस्कद्वारे वीजबिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे, याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे. तेव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता परिमंडळातील थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.