
सध्या मुंबईत स्थायिक झालेले मुकुल गरे यांचे जीवनच प्रेरणादायी आहे. प्रत्येक श्वासासाठी झुंज देत इतरांचा आधार बनणाऱ्या मुकुल यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.
यवतमाळ : प्रत्येक व्यक्तीच्या वाटेला संघर्ष येतोच. काही व्यक्ती लढण्यापूर्वीच हार पत्करतात तर काही शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देतात. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि परमेश्वरावरील गाढ श्रद्धा असलेल्या व्यक्ती आयुष्याला नवा आकार देतात. गेल्या पन्नास वर्षांपासून आयुष्याशी झुंज देणाऱ्या यवतमाळच्या मुकुल गरे यांचा जीवनसंघर्ष हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षातून जीवन जगण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांचे नातेवाईक आणि मित्र सांगतात.
सध्या मुंबईत स्थायिक झालेले मुकुल गरे यांचे जीवनच प्रेरणादायी आहे. प्रत्येक श्वासासाठी झुंज देत इतरांचा आधार बनणाऱ्या मुकुल यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. जन्मत: हृदयाला छिद्र असलेला मुकुल केवळ दोन वर्षांचे आयुष्य जगेल, असे डॉक्टरांनी त्यांच्या पालकांना सांगितले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. परंतु, मुकुलने तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर आज ायुष्याचे अर्धशतक पार केले आहे. नव्हे, तो आयुष्य खऱ्या अर्थाने जगला आहे.
क्लिक करा - हा खेळ नव्हे तर भाकरीचा चंद्र शोधण्याचा प्रयत्न
क्रिकेट, व्हायोलिनवादन, पत्रकारिता, लेखन, नाट्य, टीव्ही व सिनेमात अभिनय, समूपदेशक, वैद्यकीय सल्लागार, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिका त्यांनी आपल्या जीवनाच्या रंगभूमीवर लीलया साकारले आहेत. मुकुलच्या हृदयाला गर्भात असतानाच छिद्र होते. मात्र, त्याचे निदान उशिरा म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी झाले. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी तुझे आयुष्य हे फार कमी कालावधीसाठी असल्याचे स्पष्ट सांगितले होते. परंतु, जेवढे आयुष्य आहे ते हसत जगायचे, असे मुकुलने ठरवून टाकले आणि याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारे त्याने यशस्वीरीत्या आयुष्याचे अर्धशतक गाठले आणि तेही इतरांना मदत करीत.
हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांचे त्यांनी समूपदेशन केले, मदत केली व मार्गदर्शनही मिळवून दिले. मुकुलने शालेय शिक्षण व पदवी प्राप्त केल्यावर यवतमाळ येथूनच पत्रकारितेची पदवी मिळविली. त्यानंतर मेडिकल रिप्रेंझेटिव्हची नोकरी पत्करली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी मुकुलचे लग्न झाले. त्यांनी मुंबईलाच विधवा महिलेशी विवाह केला. तिला तिच्या मुलासह स्वीकारत आधार दिला. हृदयाला छिद्र असलेल्यांना काय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव मुकुलला होती. त्यामुळे त्याने अशा रुग्णांसाठी समूपदेशन केंद्र सुरू केले. उपचार करण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशांना ते शक्य ती मदत करतात. सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतात.
क्लिक करा - कर्ज फेडणार कसे? आत्महत्याच करतो ना...
हा आजार मुलाला गर्भात असतानाच होतो. आईने चुकीचे औषध-उपचार घेतल्यास तसेच फास्टफूड व बदलती आहारशैली, जीवनपद्धती यामुळेही हा आजार बळावतो. पूर्वी याचे निदान लवकर होत नव्हते. मुकुलला व्हीएसडी हा आजार झाला. त्यांना डॉ. चैतन्य गोखले व यवतमाळचे डॉ. हर्षवर्धन बोरा, डॉ. मनोज बरलोटा आदींनी मोठी मदत केली आहे.
एक वर्षापूर्वी मुकुलने झुंज श्वासाशी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची प्रचंड विक्री झाली. महानायक अमिताभ बच्चनपासून एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे प्रमुख असलेले सुभाष चंद्रा, माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण अशा अनेक नामवंतांनी हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाल्याचा अभिप्राय दिला. मुकुलने अभिनयाची आवड असल्याने त्याही क्षेत्रांत स्वत:ला आजमाविले आहे. रामगोलाल वर्मा यांच्या "डी' सिनेमासह अनेक हिंदी सिनेमे, हिंदी-मराठी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. काजोल, या गोजिरवाण्या घरात, आकाशझेप, मुंबई पोलिस, खिलाडी, कुमुकुम, मायेची सावली, एक होता विदूषक, अशा सिनेमा व मालिकांमधील त्याचा अभिनय गाजला.
सविस्तर वाचा - 'त्या' मृत बालिकेची डी.एन.ए. तपासणी करा : नीलम गोऱ्हे
रायपूर येथे मोठ्या रुग्णालयात हृदयाच्या छिद्रावर मोफत शस्त्रक्रिया होते. परंतु, तेथे प्रतीक्षा यादी खूप जास्त असते. इतर ठिकाणी एका रुग्णाला तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. राज्य सरकारने मुंबई, नागपूर किंवा पुण्यासारख्या शहरात, या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी रायपूरच्या धर्तीवर रुग्णालय उभारावे, अशी मुकुल गरे यांची मागणी आहे. हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना प्राणवायू कमी मिळतो. हिमोग्लोबिन वाढते. दरवेळी 250 ते 300 मिलीलीटर रक्त काढावे लागते. भारतात एक लाख लोकांमागे 50 जणांना हा आजार आढळून येतो. सध्या देशात या आजाराचे सव्वासहा ते साडेसहा लाख रुग्ण आहेत.