महात्मा गांधी जयंती विशेष : मूल, सावली आणि महात्मा गांधी

mull, savali and Mahatma Gandhi read full story
mull, savali and Mahatma Gandhi read full story

चंद्रपूर : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे स्थान अनन्यसाधारण आहे. १९४२च्या ‘चले जाव चळवळीत’ येथील सत्याग्रहींनी अमूल्य योगदान दिले होते. तसेच तुरुंगवासही भोगला आहे. महात्मा गांधीच्या विचारांनी आणि ‘करेंगे या मरेंगे’ या नाऱ्यांनी स्वातंत्र्याचे वारे चांगलेच भिनत होते. राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा परिस पद स्पर्श मूलला दोनदा लाभला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.

सन १९३३ आणि १९३६ रोजी महात्मा गांधी मूलवरून सावलीला गेले होते. ज्या मार्गाने गेले त्याच मार्गावर मूलमध्ये महात्मा गांधीजींचा संगमवरी पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्या पुतळयाचे अनावरण २४ डिसेंबर १९६१ रोजी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री मा. सां. कन्नमवार होते. पुतळ्याच्या उभारणीसाठी देणगी नामदेव सोमन्नाजी गोगीरवार यांनी आपले बंधु कै. सितारामजी गोगीरवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिली होती.

मूल आणि सावली परिसरात मं. गांधीजींचा विचार ओतप्रोत भरलेला आहे. स्वातंत्र्याच्या काळात खादीला विशेष महत्व होते. स्वदेशीचा तो एक भाग होता. खेड्याकडे चला आणि ग्रामोद्योगाची उभारणी करून स्वयंरोजगार प्राप्त करा हा गांधीजींचा विचार होता. स्वदेशी, खादीचा प्रचार प्रसार आणि हरीजन सेवा संघाच्या दौऱ्याच्या वेळी मूल आणि सावलीला भेट दिली. १९३३च्या या काळात मं. गांधींनी वरघंटे यांची विहीर हरीजनासाठी खुली करून दिल्याचे सांगितले जाते. सन १९३६ रोजी परत एकदा गांधीजी मूलवरून सावलीला गेले. त्यावेळेस त्यांनी एक आठवडा सावली येथे खादी केंद्रात मुक्काम केला होता.

विचार अनेकांना प्रेरणादायी

महात्मा गांधीजींचा विचार अनेकांना प्रेरणादायी ठरला. स्वदेशी, स्वराज्य आणि राष्टीय शिक्षणाच्या कार्यात स्वातंत्र्य संग्राम सैनिक वसंतरावजी आपटे, गजानन गव्हाणकर, दत्तात्रय मुसली, निळकंठ माडेकर, जानकीरामजी दंडेवार या महान विभूतींनी स्वतःला झोकून दिले. १९४२च्या चले जाव चळवळीत जानकीराम दंडेवार यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. ब्रिटीशांचा लाठीमार खाल्ला पण त्यांनी इंग्रजांची माफी मागितली नाही. गजानन गव्हाणकर हे स्वतः दांडी यात्रेत सहभागी झाले होते.

कार्य मूल आणि सावली येथे अविरत पणे सुरू

मूल येथे सन १९५८ मध्ये खादी आयोग नियोजन विभागाचे सदस्य आणि गांधीजींचे अनुयायी अण्णासाहेब सहस्त्रबुदधे यांनी उदयोगपती जमनालाल बजाज, बाबूराव सोहनी, केशवराव जांभूळकर, वसंतराव आपटे, का. शि. संतोषवार, शंकरराव वेले यांच्या उपस्थितीत नाग विदर्भ चरखा संघाची स्थापना केली. त्याचे कार्य मूल आणि सावली येथे अविरत पणे आजही सुरू आहे. मूलमध्ये आजच्या स्थितीला निंबोळी साबण आणि तिळाच्या तेलाचे उत्पादन घेतल्या जाते. जवळपास २५ घरांमध्ये आधुनिक चरख्या वर सुतकताई केली जाते.

उत्कृष्ठ विणकर कारागिरीचा पुरस्कार

निंबोळी साबणाचे वार्षिक उत्पन्न आठ ते दहा लाख रुपये इतके आहे तर तिळाच्या तेलाचे वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाख रुपये इतके आहे. सूतगुंडी दर महिण्याला तीनशे किलो नागपूर केंद्राला पाठविले जाते. सावलीमध्ये चरख्यावर सूतकताई केली जाते. मूल आणि सावली या दोन्ही ठिकाणी खादी भांडार या केंद्रातून खादीच्या वस्त्रांची विक्री केली जाते. काळानुरूप विणकर कमी झाल्याने आता मूलच्या केंद्रामध्ये खादी विणली जात नाही. मात्र, सावलीमध्ये विणाई काम केले जाते. नाग विदर्भ चरखा संघाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. उत्कृष्ठ विणकर कारागिरीचा पुरस्कार सुद्धा मूल केंद्राला मिळालेला आहे.

१९३६ मध्ये मूल खादी विद्यालयाची स्थापना

सन १९३६ मध्ये मूल खादी विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. उत्पादीत खादी कापडाची रंगाई आणि धुलाई येथे होत होती. या खादी विद्यालयात अण्णासाहेब सहस्त्रबुदधे, शंकरराव वेले, वंसतराव आपटे, गजानन गव्हाणकर स्वता कार्यरत होते. गांधीजींच्या विचारांनी आणि त्यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या सावली येथील खादी केंद्राला विनोबा भावे आणि त्यांचे वडील बाळकोबा भावे, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरोजीनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल या सारख्या दिग्गजांनी भेटी दिली आहेत.

मानसपुत्र कृष्णदास गांधी यांचा विवाह सोहळा

महात्मा गांधी यांचे मानसपुत्र कृष्णदास गांधी यांचा विवाह सोहळा सावली येथील खादी कार्यालय परिसरातील आंब्याच्या झाडाखाली अंत्यंत साध्या पदधतीने पार पडला होता, हे विशेष... आज खादीला आत्मनिर्भरतेची गरज आहे. खादी ग्रामोद्योगाला आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. कोवीड १९ चा फटका बसला आहे. आत्मनिर्भर भारत या केंद्र शासनाच्या संकल्पनेतील उपक्रमातून खादी ग्रामोद्योगाला चांगले दिवस येईल काय, असा प्रश्न खादी ग्रामोद्योगामध्ये काम करणाऱ्या अनेक कारागीरांचा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com