
भंडारा : दोन दुचाकीस्वारांचे कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून रस्त्यात भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान मारामारीत झाले. रस्त्यावरच्या सळाखीनेच एकाने दुसऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि शेवटी जबर मारहाणीमुळे एकाचा मृत्यू झाल्याची भीषण घटना भंडाऱ्यात घडली.
शहरात दिवसाढवळ्या हेडगेवार चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर तरुणाचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. 19) दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. मोटारसायकलला कट मारल्यामुळे बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान खुनाच्या घटनेत झाले. सर्फराज ऊर्फ बाबू कासिम शेख (वय 18) असे मृताचे नाव आहे. तो लाला लजपतराय वॉर्डातील मशीद परिसरातील रहिवासी आहे. शुभम श्रीधर वाघाये (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. तो हलधरपुरी शुक्रवारी भागात राहतो.
हेडगेवार चौक ते राजस्थानी मंगल कार्यालय या मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर ही घटना घडली. सर्फराज (बाबू) हा आपल्या दोन मित्रांसह मोटारसायकलने या रस्त्यावरून जात होता. दरम्यान त्यांच्याच मागे आरोपी शुभम वाघाये हासुद्धा इतर दोन मित्रांसोबत ट्रिपल सीटने आला. या दोघांत मोटारसायकलला कट मारल्यावरून शाब्दिक वादावादी झाली. वाद हमरीतुमरीवर येताच रागाच्या भरात शुभमने शेजारी सळाखी तोडण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पडलेली लोखंडी कटौनी उचलून सर्फराजच्या कपाळावर, डोळ्यावर सपासप वार केले. त्यानंतर लाकडी दांडक्यानेही प्रहार केला. सर्फराज रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन करीत पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दहा ते पंधरा मिनिटे सर्फराज रस्त्यावर तडफडत होता. जबर मारहाणीमुळे त्याच्या चेहऱ्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. दरम्यान रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली पण तोवर सर्फराज निपचित पडला होता. त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सविस्तर वाचा - नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळणार?
आरोपी शुभम याने पोलिसांत जाताना रस्त्यावर फेकून दिलेला लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला. आरोपी शुभम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर पोलिसांत अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. याघटनेत आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता आहे. पुढील तपास ठाणेदार कानसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.