अमरावती : ढाबा मालकाने जेवण न दिल्याने एकाचा खून; दोघे गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : ढाबा मालकाने जेवण न दिल्याने एकाचा खून; दोघे गंभीर

अमरावती : ढाबा मालकाने जेवण न दिल्याने एकाचा खून; दोघे गंभीर

अमरावती : नांदगावपेठ हद्दीत रात्री ढाबा मालकाने जेवण देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी ढाबामालकासह नोकराशी वाद घालून चाकूने हल्ला केला. त्यात एकाचा खून झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास कठोरा मार्गावर साई संतोष हॉटेल (मराठा दरबार ढाबा) येथे ही घटना घडली. प्रसाद विनोद देशमुख (वय २४, रा. पंजाबराव कॉलनी, कठोरा नाका) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्ल्यात समीर रत्नाकर देशमुख व दीपक आठवले हे दोघे गंभीर जखमी झाले. (Murder-in-Amravati-Crime-News-Dispute-over-not-giving-food-nad86)

समीर देशमुख व मित्र प्रसाद देशमुख हे सदर ढाब्यावर रात्री जेवणासाठी आले. ढाबा बंद असल्यामुळे प्रसाद यांनी ढाबा मालक शेखर बिरे यांना फोन करून बोलावून घेतले. ढाबा मालकासोबत चर्चा सुरू असताना संशयित आरोपी सिद्धांत गुलाब गावंडे (वय १९, रा. पोटे टाऊनशिप) व संकेत गोवर्धन वानखडे (वय २२, रा. शेगाव नाका) हे दोघे त्याठिकाणी पोचले. त्यांनी ढाबा मालकाला जेवण द्या म्हणून वाद घातला.

मालकाने ढाबा बंद असल्यामुळे जेवण देण्यास नकार देऊन तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यावेळी झालेल्या वादात संशयित आरोपी सिद्धांत गावंडे व संकेत वानखडे यांनी ढाबा मालकास मारहाण केली. प्रसाद देशमुख व वेटर दीपक आठवले हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता संशयित आरोपींनी या दोघांवरही चाकूने हल्ला केला.

नांदगावपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रसाद देशमुख यांचा मृत्यू झाला. असे पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी सांगितले. दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. समीर देशमुख यांच्या तक्रारीवरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निरीक्षक कंट्रोलरूम अटॅच, जमादार निलंबित

सदर हॉटेल, ढाबा रात्री उशिरापर्यंत नियमबाह्यपणे सुरू होता. संबंधितांविरुद्ध कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर यांना कंट्रोल रुम अटॅच करण्यात आले असून, नांदगावपेठच्या संबंधित विभागाचे बीट जमादार याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

(Murder-in-Amravati-Crime-News-Dispute-over-not-giving-food-nad86)

टॅग्स :Crime News