पाण्यावरून झालेल्या वादातून आईला केली मारहाण; संतापलेल्या मुलाने केला शेजाऱ्याचा खून

टीम ई सकाळ
Thursday, 22 October 2020

दोन दिवसांपूर्वी राजू परचाके याने बोअरवेलच्या पाण्याच्या कारणावरून वाद करीत सागरच्या आईला मारहाण केली होती. यामुळे संतप्त सागरने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने राजू परचाके याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला.

वर्धा : आईला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या मुलाने एकाचा खून केल्याची घटना बोरगाव मेघे येथे बुधवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू बापुराव परचाके (वय ५१) असे मृताचे तर सागर ब्रह्मानंद पेंदाम (वय २१, रा. भुरे ले-आउट), जय वसंत गवळी (रा. नालवाडी) आणि शैलेश गजानन कोवे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू परचाके आणि सागर पेंदाम दोघे शेजारी आहेत. दोन दिवसांपूर्वी राजू परचाके याने बोअरवेलच्या पाण्याच्या कारणावरून वाद करीत सागरच्या आईला मारहाण केली होती. यामुळे संतप्त सागरने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने राजू परचाके याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला.

अधिक माहितीसाठी - अर्थसंकल्पातून झलकेंचे तुकाराम मुंढे यांना फटके

दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील हिरापूर येथील युवक अविनाश मिसार (वय ३०) याचा अंजनगाव रोडवरील पेट्रोलपंपाजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. दर्यापूर ते अंजनगावसुर्जी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही, असा आरोप करण्यात येतो. पुलाचे काम चालू असताना त्याठिकाणी सुरक्षेतेच्या दृष्टीने बॅरिकेट्‌स लावले नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही व अपघात होतो. त्याचाच बळी अविनाश मिसार ठरला. मंगळवारी (ता. २०) रात्री १० वाजताच्या सुमारास पुलावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाहनावर त्यांच्या मागे बसलेले पचघरे जखमी झाले असून, अमरावतीत उपचार सुरू आहेत.

क्लिक करा - रस्त्यावरील झाडांच्या खोडाला का असतो पांढरा-लाल रंग? जाणून घ्या यामागचं महत्वाचं कारण

घरफोडीतप्रकरणी तिघांना २५ पर्यंत कोठडी

अमरावतीच्या आयुक्तालयातील घरफोडीप्रकरणी गुन्हेशाखेने बुधवारी तिघांना अटक केली. त्यांना जिल्हा न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तिघांनी सद्य:स्थितीत शहरातील नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीत झालेल्या लाखो रुपयांच्या घरफोडीची कबुली दिली. शहरातील चार ते पाच घरफोड्यांचे गुन्हे चौकशीअंती उघडकीस येतील, अशी शक्‍यता पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी व्यक्त केली. अब्दुल इमरान अब्दुल जाकीर (सुफियाननगर), सोहेल खान ऊर्फ सोनू शमी खान, असलम शाह ऊर्फ गोलू अहमद शाह (दोघेही रा. वाहेदनगर) अशी पोलिस कोठडीत असलेल्या तिघांची नावे आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a neighbor by a child for beating a mother