esakal | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने कुर्तीने गळा आवळून केला खून
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने कुर्तीने गळा आवळून केला खून

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने कुर्तीने गळा आवळून केला खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : राजेदहेगाव येथील सुयोगनगर परिसरात शनिवारी रात्री पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. मृताचे नाव स्नेहलता लंकेश्‍वर खांडेकर (वय २४) असे आहे. तिच्या चारित्र्यांवरील संशयातून हा खून झाल्याची परिसरात चर्चा आहे. पोलिसांनी आरोपी लंकेश्‍वर खांडेकर याला ताब्यात घेतले आहे. (Murder-news-crime-in-Bhandara-husband-killed-wife-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील निहारवानी येथील लंकेश्‍वर खांडेकर हा आयुध निर्माणीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. त्याचे पाच वर्षांपूर्वी स्नेहलतासोबत लग्न झाले. दोघेही राजेदहेगाव येथील सुयोगनगरात राहत होते. त्यांना चार वर्षे वयाची एक मुलगी आहे. स्नेहलता ही आधी सावरी येथील एका खासगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करत होती.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

पतीने चारित्र्यवर संशय घेतल्यामुळे तिने दवाखान्यात जाणे सोडून दिले होते. तिला दवाखान्यात कामाचा अनुभव असल्याने मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये काम मिळाले. सुमारे वर्षभर स्नेहलताने तेथे नोकरी केली. परंतु, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन परिस्थिती सुधारल्याने तिची नोकरी गेली. त्यामुळे ती पतीकडे सुयोगनगर येथे परत आली.

पती लंकेश्‍वर दिवसभर कंत्राटी कामावर आयुध निर्माणीत जातो. तेव्हा पत्नीचा प्रियकर तिला भेटायला येत असावा, असा संशय त्याच्या मनात होता. त्यावरून दोघांमध्ये वाद होत होते. शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाल्यानंतर लंकेश्‍वर याने कुर्तीने गळा आवळून स्नेहलता हिचा खून केला. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. या प्रकरणावरून परिसरात अनेक चर्चा होत आहेत. जवाहरनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, ठाणेदार पी. ए. बैसाणे तपास करीत आहेत.

(Murder-news-crime-in-Bhandara-husband-killed-wife-nad86)

loading image