दिवस गुरुवार, वेळ दुपारी १२ ते १.३० अन् दोन खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवस गुरुवार, वेळ दुपारी १२ ते १.३० अन् दोन खून

दिवस गुरुवार, वेळ दुपारी १२ ते १.३० अन् दोन खून

अमरावती : तासाभरात विविध घटनेत दोघांची हत्या झाल्यामुळे अमरावती शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. १२) दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या सुमारास या घटना घडल्या. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीची हत्या केली. तर फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना उजेडात आली.

पूजा विजय राठोड (वय २२, रा. आदर्शनगर) हिचा विवाह दहा महिन्यांपूर्वीच विजय दादाराव राठोड (वय २५) याच्याशी झाला होता. दोघेही गोपालनगर जवळच्या आदर्शनगरात भाड्याच्या खोलीत राहत होते. दोन दिवसांपूर्वी पूजाचा नवीन मोबाईल फुटून निकामी झाला. तिने दुसरा मोबाईल घेण्यासाठी पतीला म्हटले. पतीने तिला थांबण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाद झाला. विजयने पूजाच्या तोंडावर बुक्की मारल्याने ती पडली. त्यानंतर विजयने गळा आवळून पत्नीचा खून केला. पत्नीच्या खुनानंतर विजयने स्वत:च राजापेठ ठाण्यात पोलिसांपुढे घटनाक्रम सांगून आत्मसमर्पण केले.

दुसऱ्या घटनेत, फ्रेजरपुरा हद्दीतील सिद्धार्थमंडळ जवळच्या पहिल्याच गल्लीत जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून झाला. अनिकेत ज्ञानदीप कोकणे (वय १८) हा यशोदानगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याच्या मागावर तिघे युवक होते. त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे घाबरून अनिकेत एटीएमजवळून पळाला. फ्रेजरपुरा येथील गल्ली नंबर एकमध्ये लपण्यासाठी एका बंद घराच्या पॅसेजमध्ये घुसला. त्याचठिकाणी तिघांनी गाठून धारदार शस्त्राने अनिकेतच्या गळ्यावर, पोटावर वार करून खून केला. खून केल्यानंतर तिघेही पसार झाले. अनिकेत व त्याच्या काही साथीदारांनी डिसेंबर २०२० मध्ये एकाचा खून केल्याचा आरोप होता. काही दिवसांपूर्वीच अनिकेत जामिनावर बाहेर आला होता.

क्षणिक राग हे पत्नीच्या हत्येचे कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. स्वत:च कबुली दिल्याने पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे
सात महिन्यांपूर्वी यशोदानगरात युवकाचा खून झाला होता. त्यात अनिकेत संशयित आरोपी होता. बदला घेण्याच्या उद्देशाने अनिकेतचा खून झाल्याची शक्यता पोलिस पडताळून पाहत आहे.
- पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे
टॅग्स :Crime News