तू आमच्या माणसाला कट मारलास, असे म्हणत वाद घातला आणि पुढे...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

जितेंद्र ऊर्फ गणेश किसनराव महल्ले (वय 40, रा. दारव्हा, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. जितेंद्र महल्ले ट्रकने (क्र. एमएच 30 एबी 0889) नागपूरवरून रायपूरकडे काही साहित्य घेऊन जात होता.

देवरी (जि. गोंदिया) :  "तू आमच्या माणसाला कट मारलास, तुझ्या ट्रकची फाइल दे', असे म्हणत तीन जणांनी ट्रकचालकाला रॉडने जबर मारहाण केली. यात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या तीन तासांत तीनही आरोपींना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

ही घटना शिरपूरबांध येथील तपासणी नाक्‍यावर मंगळवारी (ता. 9) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. जितेंद्र ऊर्फ गणेश किसनराव महल्ले (वय 40, रा. दारव्हा, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. जितेंद्र महल्ले ट्रकने (क्र. एमएच 30 एबी 0889) नागपूरवरून रायपूरकडे काही साहित्य घेऊन जात होता.

यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ संजय महल्ले (वय 44) हजर होता. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रक शिरपूरबांध येथील तपासणी नाक्‍यावर नेत असताना एका व्यक्तीला ट्रकचा धक्का लागला. त्यानंतर "तू आमच्या माणसाला कट मारलास, तुझ्या ट्रकची फाइल दे', असे म्हणत सद्‌भावना कंपनीचे कर्मचारी अमित सहादेव गंथाडे (वय 35, रा. कामठी, नागपूर), राहुल देवकुमार पांडे (वय 29, रा. काशीपूर, बिहार) या दोघांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचा शिपाई प्रफुल्ल तेजराम साखरे (वय 31, रा. कुऱ्हाडी, ता. गोरेगाव) याने लोखंडी रॉडने जितेंद्र महल्लेला जबर मारहाण केली.

कधी सुरू होणार नागपूरची आपली बस? जाणून घ्या प्रवासाच्या व्यवस्थेबाबत

या मारहाणीत जितेंद्रचा मृत्यू झाला. दरम्यान, मृताचा भाऊ संजय महल्ले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, ठाणेदार नागेश भास्कर यांच्यासह पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली. पुढील तपास ठाणेदार भास्कर करीत आहेत.

नाक्‍यावर घडतात मारहाणीच्या घटना

शिरपूरबांध सीमा तपासणी नाक्‍यावर सातत्याने मारहाणीच्या घटना घडत असल्याचे बोलले जाते. मंगळवारी ट्रकचालकाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder for trivial reasons, three arrested