दगडाने ठेचून पत्नीच्या प्रियकराचा खून, वर्धा जिल्हा हादरला

रूपेश खैरी
Thursday, 13 August 2020

कैलास ढुमणे हा आरोपी विलास कासार याच्या पत्नीसोबत मागील काही दिवसांपासून वर्ध्यात आला होता. आपली पत्नी कैलाससोबत वर्ध्यात राहत असल्याची माहिती विलास कासार याला मिळाली. विलासने थेट वर्धा गाठून पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला.

वर्धा  : प्रेमसंबंधातून पतीने पत्नीच्या प्रियकाराचा दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास नागठाणा परिसरात घडली. कैलास ढुमणे (रा. मोहा, जि. यवतमाळ), असे मृताचे तर विलास ऊर्फ बाल्या कासार (रा. कळंब, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास ढुमणे हा आरोपी विलास कासार याच्या पत्नीसोबत मागील काही दिवसांपासून वर्ध्यात आला होता. आपली पत्नी कैलाससोबत वर्ध्यात राहत असल्याची माहिती विलास कासार याला मिळाली. विलासने थेट वर्धा गाठून पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला. दरम्यान, तेथे तिघांनीही एकमेकांसोबत चर्चा केली. त्यानंतर विलास कासार, कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी हे तिघेही पायी नागठाणा रस्त्याने धोत्रा (रेल्वे) येथे जाण्यास निघाले. 

जाणून घ्या - ‘बाळा... आईची काळजी घे, आता तुलाच सांभाळायचे आहे' वडिलांचे हे वाक्य मुलाला समजलेच नाही अन्...

असा काढला काटा...

मात्र, पाऊस सुरू झाल्याने तिघांनीही रस्त्यावरील एका ढाब्याचा आसरा घेतला. तिघांनी तिथे जेवण केले. पण, पाऊस सुरूच होता. तिघांनी तिथेच मुक्‍काम करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी गाढ झोपेत असताना मनात राग धरून असलेल्या विलास ऊर्फ बाल्या कासार याने रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या दगडाने कैलासच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून त्याचा खून केला. हा प्रकार बघताच विलासच्या पत्नीने आरडाओरडा केली. दरम्यान, विलास कासार याने तेथून पळ काढला.

 

रामनगर परिसरात खळबळ

परिसरातील नागरिकांना ओरडण्याचा आवाज आला असता नागरिक घराबाहेर आले. त्यांना कैलास ढुमणे हा रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यातील एका नागरिकाने रामनगर ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांना खुनाची माहिती दिली. रामनगर ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.
 

श्‍वानपथकाची मदत

खुनातील आरोपीचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी गुरूवारी सकाळी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते, पण आरोपीचा शोध लागला नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of wife's lover crushed by stone in Wardha