कारागृहाबाहेर येताच पूर्ववैमनस्यातून मारेकऱ्यांनी काढला काटा

सुरज पाटील
Wednesday, 26 August 2020

दुपारी दोनच्या दरम्यान येथील लोहारा परिसरातील दारव्हा रोडवर घडली. पूर्ववैमनस्यातून मारेकऱ्यांनी काढला काटा काढला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

यवतमाळ : महिनाभरापूर्वी जिल्हा कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना आज बुधवारी (ता.२६) दुपारी दोनच्या दरम्यान येथील लोहारा परिसरातील दारव्हा रोडवर घडली. पूर्ववैमनस्यातून मारेकऱ्यांनी काढला काटा काढला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

देवीदास निरंजन चव्हाण (वय २५, रा. उद्योगनगर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. २०१८ मधील सप्टेंबर महिन्यात देवीदास याने भय्या यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने हल्ला परतवून लावण्यासाठी गोळीबारदेखील केला होता. याच घटनेपासून देवीदास हा जिल्हा कारागृहात होता. जवळपास महिनाभरापूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. तर, त्याचा भाऊ दुर्गेश एका खून प्रकरणात कारागृहात आहे.

चव्हाण बंधू गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने विरोधी टोळीचे सदस्य देविदासच्या मागावर होते. आज बुधवारी दुपारी दुचाकीने जात असताना मारेकऱ्यांनी त्याला खाली पाडले व धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून केला. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, देवीदास रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. घाव वर्मी लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहारा व अवधूतवाडी पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मारेकरी तीन ते चार जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, वृत्तलिहेस्तोवर गुन्हा नोंद झालेला नव्हता.

दोन वर्षांपूर्वी पीएसआयचा गोळीबार
दोन वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१८ ला गणपती विसर्जनाच्या दिवशी देवीदास चव्हाण याने भय्या यादव याच्यावर हल्ला चढविला होता. त्याचवेळी पेट्रोलिंगवर असलेले टोळी विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी देविदासने त्यांच्यावरदेखील हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला परतवून लावण्यासाठी पीएसआय मनवर यांनी गोळीबार केला होता.

सविस्तर वाचा - नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी मुंबईत बदली

मृताचा भाऊ खून प्रकरणात कारागृहात
गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादात मागील काही महिन्यांपूर्वी लोहारा येथील देशी दारूच्या दुकानासमोर मायाभाई उर्फ सोहेल खान याचा खून झाला होता. या खून प्रकरणात देविदासचा भाऊ दुर्गेश चव्हाण आरोपी असून, तो सध्या जिल्हा कारागृहात आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in Yavatmal