शुल्लक वादाचे रूपांतर झाले हाणामारीत, लोखंडी रॉडही आणले आणि मग... 

प्रतीक मालवीय 
Monday, 20 July 2020

अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्‍यातील दोन तरुणांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की यात एका तरुणाला अक्षरशः आपला जीव गमवावा लागला आहे.

धारणी (अमरावती ) : आजकाल शुल्लक कारणांवरून झालेला वाद कधी चिघळेल आणि त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यांमध्ये होईल काहीही सांगता येत नाही. आपल्यासोबत बोलणारा, हसणारा व्यक्ती कधी आपल्याच जीवाचा शत्रू होईल यांचा काहीही नेम नाही. अशा प्रकारच्या शुल्लक कारणांवरून वैमनस्य निर्माण होऊन लोकं एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाही. 

अमरावती जिल्ह्यातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यात सध्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्‍यातील दोन तरुणांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की यात एका तरुणाला अक्षरशः आपला जीव गमवावा लागला आहे. 

हेही वाचा - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
 

धारणी येथील टिंग्या मार्गावर दोन युवकांमधला वाद प्रचंड वाढून संदीप झारेकर नावाच्या युवकाने सय्यद शोएब सय्यद सईद याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या दोघांतील शाब्दिक चकमक वाढल्यानंतर संदीपने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांमार्फत समोर आली आहे. 

काय आहे घटना 

रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. संदीप झारेकर व सय्यद शोएब सय्यद सईद (वय.) या दोघांतील शाब्दिक चकमक वाढल्यानंतर संदीपने लोखंडी रॉडनी शोएबवर वार केले. घटनास्थळी संदीपसोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनी सुद्धा लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी शोएबचा जागीच मृत्यू झाला. 

 

मृताच्या आईने केली तक्रार 

मृत युवकाची आई सईदा बी यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. हल्ल्यानंतर काही तासातच हल्ल्यात सहभागी लोकांना अटक केली. संदीप परसराम झारेकर, लखन दारसिंबे, सूरज दारसिंबे, संजू सेलेकर, राजेंद्र दारसिंबे, राकेश दारसिंबे, लाडकी दारसिंबे, मग्राय दारसिंबे अशी अटकेतील युवकांची नावे असल्याचे धारणी पोलिसांनी सांगितले. 

 

क्षणिक रागातून घडला गुन्हा 
अल्पवयीन युवकाच्या खुनाच्या घटनेमागे पूर्ववैमनस्य नाही. क्षणिक रागातून ही घटना घडली. 
- लहू मोहंदुळे 
पोलिस निरीक्षक, धारणी ठाणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young man in Dharni