"म्युझिएम ऑन व्हील' 28 हजार 340 किलोमीटरचा प्रवास करून येणार शहरात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

- 18 ते 24 नोव्हेंबरदरम्यान नागपूरकरांसाठी फिरत्या संग्रहालयाची पर्वणी
- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने स्थापन केले चालते-फिरते संग्रहालय
- बसमध्ये माहितीपट, कलासाहित्य, दृकश्राव्य साधने आणि टच स्क्रीन, डिजिटल टॅब्लेट्‌ससारखी उपकरणे
- देखाव्यांची माहिती डिजिटल उपकरणांद्वारे सांगण्याची सोय

नागपूर : भारतीय वारसा जोपासण्यात संग्रहालय संस्कृतीचे मौलिक योगदान आहे. या समृद्धीचे दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्यक्ष तेथे जाण्यावाचून पर्याय नसतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने हीच बाब ओळखून चालते-फिरते संग्रहालय स्थापन केले. तब्बल 28 हजार 340 किलोमीटरचा प्रवास करून संग्रहालय नागपुरात येणार आहे. 18 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हे चालते-फिरते संग्रहालय नागपूरकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. 
वातानुकूलित बसमध्ये हे चालते फिरते संग्रहालय तयार केले असून, "म्युझिएम ऑन व्हील' असे त्याचे नाव आहे. यात माहितीपट, कलासाहित्य, दृकश्राव्य साधने आणि टच स्क्रीन, डिजिटल टॅब्लेट्‌ससारखी उपकरणे आहेत. यातील प्रदर्शन गरजेनुसार बदलता येऊ शकतात. इतकेच नव्हे, तर यातील देखाव्यांची माहिती डिजिटल उपकरणांद्वारे सांगण्याची सोय उपलब्ध आहे. 20 ऑक्‍टोबर 2015 रोजी स्थापन झालेले हे संग्रहालय सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे. पहिल्या दिवशी हे संग्रहालय शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात (अजब बंगला) राहणार असून, या ठिकाणी शिक्षकांसाठी विशेष सत्र ठेवण्यात येणार आहे. नंतर ही बस शहरातील विविध शैक्षणिक संस्थान, शाळा, महाविद्यालयांना भेट देणार आहे. या चालत्या-फिरत्या संग्रहालयाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, लोणावळा, तेर आणि कोल्हापूर येथील एकूण 225 शैक्षणिक संस्था अणि 37 हून अधिक सार्वजनिक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. तर जवळपास 7 लाख, 44 हजार 485 दर्शकांनी संग्रहालयास भेट दिल्या आहेत. 
विद्यार्थ्यांनी जरूर भेट द्यावी 
संग्रहालयात शिक्षकांसाठी विशेष "द मिस्टरी ऑफ लिवग फॉसिल्स' जिवंत जीवाश्‍म संकल्पनेची माहिती व अशा निरनिराळ्या प्रजातींची ओळख कार्यशाळा उभारण्यात आली आहे. ज्वालामुखी उद्रेकाची प्रक्रिया व जीवाश्‍म अश्‍मचक्रात कसे बनतात, यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांनी चालते-फिरते संग्रहालय बघावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Museum on Wheels' will travel 28 thousand 340 kilometers into the city