वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

अज्ञात वाहनाच्या आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून कपिल बोदले यांच्या दुचाकीला धडक जबर धडक दिली

नागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार तर त्यांची 6 वर्षांची मुलगी व 8 वर्षांचा मुलगा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी गिट्टीखदान हद्दीतील फेटरीकडून नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर घडली. घटनेनंतर वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल नरेंद्र बोदले (35, रा. खलासी लाइन, मोहननगर क्‍लबजवळ, नागपूर) हे त्यांच्या (एमएच 40 / एच 5817) क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी सपना (30), मुलगी सोनाक्षी (6) आणि मुलगा देवांश (8) हे चौघे 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजताच्या दरम्यान दुचाकीने बाहेर जात होते. गिट्टीखदान हद्दीतील फेटरीकडून नागपुरकडे येणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाच्या आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून कपिल बोदले यांच्या दुचाकीला धडक जबर धडक दिली.

घटनेनंतर वाहनचालक पळून गेला

ही धडक इतकी जबर होती की या अपघातात कपिल व सपना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सोनाक्षी व देवांश गंभीर जखमी झाले. घटनेनंतर वाहनचालक पळून गेला. कपिल बोदले हे रविनगरातील गोविंददास सेकसरीया कॉमर्स महाविद्यालयात सफाई कामगार तर पत्नी सपना या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. याप्रकरणी फिर्यादी नरेंद्र मारोती बोदले (60) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, accident, couple died