नागपूरच्या अनुपची हिंदी चित्रपटसृष्टीत वाहवा

मोहित खेडीकर
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

सात वर्षांपूर्वी मुंबई गाठली तेव्हा अनुप स्ट्रगलिंग ऍक्‍टर होता. त्याचा स्ट्रगलिंग ऍक्‍टर ते अभिनेतापर्यंतचा प्रवास चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे. अभिनयाची आवड, मेहनतीची इच्छा व सातत्य असेल तर या रंगेरी दुनियेत पाय रोवणे शक्‍य असल्याचे अनुप सांगतो.

नागपूर : बलात्कार पीडितेच्या संघर्षाची कहाणी घेऊन नुकताच "सेक्‍शन 375' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या सिनेसृष्टीत या चित्रपटपटाची भरपूर स्तुती सुरू आहे. यात पीडितेच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता चांगलाच भाव खाऊन गेला. चित्रपटातील हा प्रमोद डांगळे मूळचा नागपूरचा असून सध्या सिनेसृष्टीत त्याच्या अभिनयाची चांगलीच वाहवा होत आहे. त्याचे नाव आहे अनुप चौधरी.
नागपूरच्या भूमीत लहानाचा मोठा झालेल्या अनुपने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. शिक्षणाने इंजिनिअर असला तरी त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे काही वर्षे रंगभूमीवर काम केल्यानंतर त्याने सात वर्षांपूर्वी स्वप्ननगरी मुंबई गाठली. रंगभूमीचा अनुभव गाठीशी असल्याने त्याला पहिल्या तीन महिन्यांतच एका नामांकित वाहिनीच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. सिनेमावर अधिक प्रेम असल्यामुळे अनुपने त्यावर लक्ष केंद्रित केले. अभिनयाची आवड, मेहनत आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर अनुपने हळूहळू मराठी सिनेसृष्टीत काम मिळवले. त्याने आजवर राखणदार, उर्फी व एकता या मराठी चित्रपटात अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केले आहे. मराठीबरोबरच अनुपने हिंदी चित्रपटासाठीही प्रयत्न सुरू केले. त्यात त्याला लवकरच यशही मिळाले.
अनुपचा नुकताच "सेक्‍शन 375' नावाचा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता अक्षय खन्ना, अभिनेत्री मीरा चोप्रा, मराठी अभिनेता किशोर कदम यांच्यासारख्या नामवंत कलाकारांनी काम केले आहे. यात अनुपने साकारलेल्या प्रमोद डांगळे या व्यक्तिरेखेची दखल अनेक प्रसिद्ध चित्रपट समीक्षकांनी घेतली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांबरोबरच अनुपने हॉटस्टारवरील क्रिमिनल जस्टिस, झी 5 वरील बॉम्बर्स, व्हॉट्‌सऍप लव्ह, क्राईम पॅट्रोल व सावधान इंडियामध्येदेखील काम केले आहे.

दोन मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर
उपेंद्र लिमये यांच्यासोबत अनुपने "हुस्पा झाला रे' या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तर "रेश्‍टिप'ची पटकथा अनुपनेच लिहिली आहे. हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे अनुपने सांगितले.

स्ट्रगलिंग ऍक्‍टर ते अभिनेता
सात वर्षांपूर्वी मुंबई गाठली तेव्हा अनुप स्ट्रगलिंग ऍक्‍टर होता. त्याचा स्ट्रगलिंग ऍक्‍टर ते अभिनेतापर्यंतचा प्रवास चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे. अभिनयाची आवड, मेहनतीची इच्छा व सातत्य असेल तर या रंगेरी दुनियेत पाय रोवणे शक्‍य असल्याचे अनुप सांगतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur actor anup choudhary getting appreciation in hindi film industry