
नागपूर : विदर्भासाठी घोषणा करायची आणि नंतर प्रलंबित ठेवायची ही महाराष्ट्र शासनाची जुनीच परंपरा. सहा ते सात वर्षांपूर्वी मेयो रुग्णालयात पोस्ट बीएसस्सी नर्सिंग कॉलेज तसेच यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएसस्सी नर्सिंग कॉलेजचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मंजूर झाले. परंतु, विदर्भातील दोन्ही प्रस्ताव थंडबस्त्यात आहेत. मात्र, नांदेड येथे बीएसस्सी नर्सिंग कॉलेज मंजूर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपुरातील मेडिकलशी संलग्न असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये 'एमएससी नर्सिंग कॉलेज' उभारण्याचा देखील निर्णय शासनाने २०११ मध्ये घेतला होता. विशेष असे की, दोन वर्षे हा प्रस्ताव रखडल्यानंतर तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय विधानसभेत पोहोचवला होता. २०१५ मध्ये सत्तापालट झाला. फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांनी पाच वर्षे मेडिकलमधील एमएसस्सी नर्सिंग सुरू करण्यासंदर्भात कोणतेही ठोस पावले उचलली नाही. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय परिचर्या परिषदेने नागपूर येथील एम.एस्सी. अभ्यासक्रमाला मंजुरी दिली होती. त्यानुसार नागपूर येथे एम.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमात मेडिकल सर्जिकल, कम्युनिटी हेल्थ, चाइल्ड हेल्थ, सायकियाट्रिक आणि गायनिक ऑबस्ट्रॅटिक या पाच विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता होती. हे कॉलेज न उभारल्याने दरवर्षी नागपुरातून सुमारे पन्नास पेक्षा अधिक परिचारिका एमएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुंबईसारख्या शहरात जातात.
केवळ ४ नर्सिंग कॉलेज शासनाची -
सध्या महाराष्ट्रात ११६ नर्सिंग कॉलेज आहेत. त्यापैकी केवळ ४ नर्सिंग कॉलेज ही राज्य शासनाची आहेत. २ केंद्रशासनाची आहेत, तर उर्वरित ११० नर्सिंग कॉलेज ही खासगी संस्थांचालकांची आहेत. नांदेड येथे ५० विद्यार्थी क्षमतेचे तयार होणारे शासनाचे पाचवे नर्सिंग कॉलेज असेल. १६ कोटी ९ लाख १४ हजार ४८० रुपये खर्चून हे नर्सिंग कॉलेज उभारण्यात येणार आहे. यासाठी वर्ग १ च्या २, वर्ग २ च्या ३ आणि वर्ग ३ च्या ३६ पदांना मान्यता देण्यात येईल. बाह्यस्रोतांद्वारे ३४ पदे भरण्यात येतील अशी माहिती आहे.
नांदेड येथे बीएसस्सी नर्सिंग कॉलेज तयार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, विदर्भात २००१ पासून एमएसस्सी नर्सिंग कॉलेज तर मेयोतील पोस्ट बीएसस्सी आणि यवतमाळ येथील बीएसस्सी नर्सिंग कॉलेज मंजूर होऊन कागदावर आहेत. पाच वर्षे नागपूरचे मुख्यमंत्री असूनही मेडिकलचे ना कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारता आले ना एमस्सी नर्सिंग कॉलेज. यामुळेच विदर्भावर अन्याय झाल्याचे सांगावे लागते.
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटना, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.