नागपूर जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी वाढली चुरस; देशमुख, राऊत, केदार, जयस्वाल स्पर्धेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला असून आता आमदारांना मंत्रिपद खुणावत आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने सर्वच पक्षाला समसमान संधीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोण मंत्री होणार? याबाबत नागरिकांत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. जिल्ह्यात मंत्रिपद देताना शहर व ग्रामीण असा समतोल साधण्यात आला होता. शहरातून माजी मंत्री नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, ग्रामीणमधून माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार व आशीष जयस्वाल यांच्यात चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे. 

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला असून आता आमदारांना मंत्रिपद खुणावत आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने सर्वच पक्षाला समसमान संधीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्यामुळे दरम्यानच्या काळात कोण-कोण मंत्री होणार? यावरही शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे नागपूरकरांतही ठाकरे मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता आहे. शहरातून कॉंग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत व शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे निवडून आले. शहरातून माजी मंत्री नितीन राऊत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी आघाडी सरकारमध्ये ते रोजगार हमी व जलसंवर्धनमंत्री होते. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यात नव्या राजकारणाचा पाया रचणारे शरद पवार यांनीही नुकताच नागपूर दौऱ्यात त्यांच्या घरी भेट दिली होती. शहरातून मंत्रिपदावर त्यांची दावेदारी मजबूत असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. ग्रामीण भागातून माजी मंत्री अनिल देशमुख, सावनेरचे आमदार सुनील केदार व रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस आहे. 1995 पासून 2014 पर्यंत अनिल देशमुख सातत्याने मंत्री होते. मागील आघाडी सरकारमध्ये ते अन्न व औषधमंत्री होते. सुनील केदार 1095 मध्ये युती सरकारमध्ये ऊर्जा व परिवहन राज्यमंत्री होते. मागील 2014 मधील निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसची पत वाचविली होती. ते जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेस आमदार होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहे. 

उत्सुकता शिगेला 
अनिल देशमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असल्याने त्यांचा दावाही मजबूत असल्याची चर्चा आहे. नुकताच नागपूर दौऱ्यावर शरद पवार यांच्या वाहनाचे त्यांनी सारथ्य केले होते. या दौऱ्यात ते सातत्याने शरद पवार यांच्यासोबत होते. रामटेकचे मूळचे शिवसैनिक असलेले अपक्ष आमदार ऍड. आशीष जयस्वाल यांनाही मंत्रिपद खुणावत आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांची मंत्री होण्याची प्रबळ इच्छा पुढे आली होती. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यात किती व कोण मंत्री होणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, anil deshmukh, sunil kedar, ashish jaiswal, nitin raut, minister