क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

गडकरी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी अत्यंत मार्मिक वक्तव्य करून आपली या वादातून सुटका करून घेतली.

नागपूर : राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काहीही घडू शकते, असे मी चार दिवसांपूर्वी बोललो होते, आज या वाक्‍याचे सर्वांना महत्त्व कळले असेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देऊन हे सरकार पाच वर्षे टिकेल, असाही विश्‍वास व्यक्त केला. 

नागपूर खासदार सांस्कृतिक महोत्सवाची घोषणा करण्यासाठी आज गडकरी यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. गडकरी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी अत्यंत मार्मिक वक्तव्य करून आपली या वादातून सुटका करून घेतली. 

वक्तव्य खरे ठरले

चार दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी क्रिकेटमध्ये येणारा बॉल दिसतो असे सांगून त्यांचे वक्तव्य खोडून काढण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, योगायोगाने गडकरी यांचे वक्तव्य खरे ठरले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापनेच्या तयारित लागले होते. शनिवारीच तीनही पक्ष राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता सुमारे एक महिन्यापासून राज्यात सुरू असलेली सत्तेसाठी सुरू असलेली कसरत संपली, असे मानल्या जात होते. मात्र, पहाटे सहालाच भाजपने सर्जिकल स्ट्राइक केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे वृत्त बाहेर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काही खरे नसते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, anything can happen in cricket and politics, nitin gadkari