बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनीच केला "गेम'; 42 लाखांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

"कुंपनांनीच शेत खाल्याचा' काहीसा प्रकार या फसवणुकीच्या प्रकरणात उघडकीस आला आहे.

नागपूर : नागपूर शहरात आणखी एक बॅंक घोटाळा उघडकीस आला. पाचपावलीतील एका खासगी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅंकेत बनावट खाते उघडून त्याद्वारे खातेधारकांकडून गोळा केलेले 42 लाख 62 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावलीतील विनकर कॉलनी, तांडापेठमध्ये नागरिक सहकारी पतपेठी मर्यादित संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष भास्कर नारायण पराते (वय 42, विनकर कॉलनी) आहेत. याच पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजू पराते आणि योगिता पराते हे बॅंकेत अभिकर्ता या पदावर कार्यरत आहेत. योगिता आणि राजू यांनी बॅंकेत बनावट नावाने खाते काढून, बनावट नावाने सह्या मारून तसेच बनावट दस्तावेज बनवून व्हावचरद्वारे पैसे काढले. दैनिक बचत खाते, आवर्त ठेव खाते, मुदत खाते, बचत खात्यातून 1 एप्रिल 2017 ते 30 जून 2018 या दरम्यान खातेदारांकडून 42 लाख 62 हजार 858 रुपये कमी भरले. ही सर्व रक्‍कम परस्पर हडप केली. एजंटच्या कोडचा वापर करून बॅंकेतून रक्‍कम काढली. ही बाब पतसंस्थाध्यक्ष भास्कर पराते यांच्या लक्षात येताच त्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी योगिता पराते व राजू पराते यांच्यावर 42 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. 

आरोपी कुटुंबातीलच! 
पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर पराते यांनी कुटुंबातील सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश केला. त्यांनी कुटुंब सदस्य राजू पराते आणि योगिता पराते यांनाही कार्यकारिणीत आणि बॅंकेत घेतले. मात्र, "कुंपनांनीच शेत खाल्याचा' काहीसा प्रकार या फसवणुकीच्या प्रकरणात उघडकीस आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, bank scam, fraud