पीक नुकसानीचा पाहणी दौरा की निव्वळ देखावा?

अमर मोकाशी
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

मोबाईलच्या प्रकाशात अधिकाऱ्यांना नुकसानाचा अंदाज आला का?. केवळ दोन शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादातून त्यांना परिपूर्ण नुकसानाचा अंदाज आला असावा काय? असे प्रश्‍न उपस्थितांनी केले.

भिवापूर : अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक आढावा घेण्यासाठी सायंकाळी सहा वाजता नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पोचले. मोबाईल टार्चच्या अंधुक प्रकाशात पथकातील सदस्यांनी शेतमालाच्या नुकसानाचा आढावा घेतला. यानंतर पथकप्रमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले. यामुळे हा नुकसान पाहणी दौरा केवळ देखावा ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

विदर्भासह नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता चंद्रपूरमार्गे नागपूर जिल्ह्यात दाखल झाले. पथकाच्या नियोजित दौऱ्यात केवळ भिवापूर तालुक्‍याचा समावेश होता. माजी आमदार सुधीर पारवे यांनी दत्तक घेतलेल्या भिवापूर तालुक्‍यातील नक्षीवडद, सोनेगाव व भिवापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन आढावा घेणार होते. त्यासाठी दुपारी तीन वाजताची वेळ देण्यात आली होती. यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी, शेतकरी व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दुपारी दोन वाजतापासून भिवापुरात पोहोचले होते. 

पाच वाजतानंतर केंद्रीय पथक आले नसल्याने ते आता कुठे पाहणी करणार अशी चर्चा सुरू झाली होती. सायंकाळी सहा वाजता केंद्रीय पथक भिवापूर येथे पोहोचले. एसडीओ हिरामन झिरवाड, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका कृषी अधिकारी जारोंडे, कृषी अधिकरी रवींद्र राठोड यांच्यासमवेत पथक नक्षीमार्गावरील माणिक लोहकरे व प्रफुल्ल गजभिये यांच्या शेतात गेले. येथे मोबाईलच्या टार्चमध्ये त्यांनी शेतमालाची पाहणी केली. अंधार अधिक गडद झाल्याने पाहणी शक्‍य नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागले. नियोजित कार्यक्रमानुसार पिकाची पाहणी करणे शक्‍य झाले नाही. मोबाईलच्या प्रकाशात अधिकाऱ्यांना नुकसानाचा अंदाज आला का?. केवळ दोन शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादातून त्यांना परिपूर्ण नुकसानाचा अंदाज आला असावा काय? असे प्रश्‍न उपस्थितांनी केले. पोहोचलेल्या अनेक शेतकऱ्यांशी पथकातील सदस्य संवाद साधू शकले नाहीत यामुळे हा पाहणी दौरा केवळ देखावा ठरेल काय?, अशी प्रतिक्रिया याकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

नवी दिल्ली येथे बैठक 
मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पथकातील काही अधिकारी तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. उद्या होणाऱ्या बैठकीत नुकसान व भरपाईवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मात्र, दौऱ्यात नुकसानाचा आढावाच घेता आला नसल्याने अधिकारी काय मांडणार असाही प्रश्‍न आहे. 

सांगितल्या व्यथा 
पथकातील अधिकाऱ्यांनी माणिक लोहकरे यांच्या शेताची पाहणी केली. लोहकरे यांनी सहा एकरांत धानाची रोवनी केली होती. त्यांना सव्वाशे क्विंटलचे उत्पन्नाचा अंदाज होता. मात्र, पावसामुळे केवळ 25 उत्पादन झाले आहे. हे धान कापणीला परवडत नाही ते जनावरांना खाऊ घालण्याशिवाय पर्याय नाही असे लोहकरे यांनी पथकाचे प्रमुख आर. पी. सिंग यांना सांगितले. याशिवाय प्रफुल्ल गजभिये यांच्या कपाशीची पाहणी कली. 

कॉंग्रेसने दिले निवेदन 
केंद्रीय पथकाच्या दौऱ्याविषयी अनेकांना माहिती नव्हती. तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीने शहराध्यक्ष दिलीप गुप्ता यांच्या नेत्रुत्वात केंद्रीय पथकाला निवेदन दिले. त्यात हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यात यावी. सरसकट कर्जमाफी करावी, वीजबिल, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे या मागण्या करण्यात आल्या. यावेळी बाजार समिती सभापती विठ्ठल राऊत, नंदा नारनवरे, राजू गारघाटे, वसंता ढोणे, बाळू इंगोले, किरण नागरीकर, अनिल मोहोड, रमेश भजभुजे, तुळशीराम चुटे, दामू तितरमारे सहभागी होते. 

शेतकऱ्यांच्या मांडल्या समस्या 
परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाचे नुकसान भरून न निघणारे आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. शेतकऱ्यांना किमान हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने जोगेंद्र सरदारे यांनी पथक प्रमुख आर. पी. सिंग यांना भेटून केली. 

पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली. खरोखरच या अधिकाऱ्यांना झालेले नुकसान मोबाईल टार्चच्या प्रकाशात दिसले असेल का? 
- वासुदेवराव मेश्राम, प्रगतिशील शेतकरी, भिवापूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, central team, crop damage, inspection