रखडले काम, नागरिकांची नगरसेवकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

नागपूर : मागील 20-25 दिवसांपासून सिवेज लाइन खोदण्यात आली. त्यातील सांडपाणी, दुर्गंधीने नागरिक त्रस्त असताना नगरसेवक ढुंकूनही पाहात नसल्याने जुनी मंगळवारीतील नागरिकांचा संयम ढळला. संतप्त झालेल्या एका नागरिकाने प्रभाग 22 मधील नगरसेवक राजेश घोडपागे यांना मारहाण केली. मात्र, घोडपागे यांनी मारहाणीच्या घटनेचा इन्कार केला असून वाद झाल्याचे सांगितले. 

नागपूर : मागील 20-25 दिवसांपासून सिवेज लाइन खोदण्यात आली. त्यातील सांडपाणी, दुर्गंधीने नागरिक त्रस्त असताना नगरसेवक ढुंकूनही पाहात नसल्याने जुनी मंगळवारीतील नागरिकांचा संयम ढळला. संतप्त झालेल्या एका नागरिकाने प्रभाग 22 मधील नगरसेवक राजेश घोडपागे यांना मारहाण केली. मात्र, घोडपागे यांनी मारहाणीच्या घटनेचा इन्कार केला असून वाद झाल्याचे सांगितले. 

प्रभाग 22 मधील जुनी मंगळवारी शहराचा जुना भाग आहे. ही वस्ती दाटीवाटीची असून रस्तेही अरुंद आहेत. या भागातील सिवेज लाइन जीर्ण झाल्याने सातत्याने तुंबत आहे. नागरिकांच्या घरात सांडपाणी परत येत असून दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. गेल्या 25 दिवसांपूर्वी सिवेज लाइन दुरुस्तीसाठी या भागात खोदकाम करण्यात आले. सिवेज लाइन उघडी असल्याने यातील घाण पाण्याच्या दुर्गंधीने चिचघरे मोहल्ल्यातील नागरिक त्रस्त असल्याचे येथील रहिवासी शुभम पौनिकर यांनी नमूद केले. खोदकाम करून कंत्राटदार पसार झाल्याने नागरिक संतप्त झाले. त्यातही नगरसेवकांनीही पाठ फिरविल्याने या परिसरातील नागरिकांचा संयम ढासळला. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नगरसेवक राजेश घोडपागे या सिवेज लाइनच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी या परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. यावेळी एका नागरिकाने घोडपागे यांच्यासोबत वाद घातला. घोडपागे यांनी नागरिकांची समजूत काढत लवकरच कंत्राटदाराकडून काम उरकले जाईल, असे सांगितले. परंतु, त्याने त्यांच्यावर हात उगारल्याचे शुभम पौनिकर म्हणाले. खरे तर कंत्राटदारावर नागरिकांचा रोष असल्याचे पौनिकर म्हणाले. 

खड्ड्यात पडले वृद्ध 
गेली 25 दिवसांपासून या खड्ड्याने, त्यातील घाण पाण्याने नागरिक त्रस्त आहेत. एवढेच नव्हे दोन वृद्ध व्यक्तीही या खड्ड्यात पडले. कंत्राटदार काम सुरू करून पसार झाला. आता एक-दोन दिवसांत काम न झाल्यास आंदोलनाचाच पर्याय उरला असल्याचे येथील नागरिकांनी नमूद केले. दुर्गंधी व सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास महापालिका जबाबदार राहील, असा इशाराही पौनिकर यांनी दिला. 

नगरसेवक गायब 
राजेश घोडपागे यांच्यासह वंदना यंगटवार, मनोज चाफले, श्रद्धा पाठकही प्रभागाचे नेतृत्व करतात. परंतु, श्रद्धा पाठक यांना अद्यापही नागरिकांनी बघितले नाही. मनोज चाफले व वंदना यंगटवार नागरिकांच्या समस्यांबाबत प्रभागात ढुंकूनही पाहात नसल्याचा आरोप पौनिकर यांनी केला. केवळ निवडणुकीत मते मागतानाच या नगरसेवकांना बघितले, अशी पुस्तीही येथील नागरिकांनी जोडली. 

प्रभागात जुनी दाटीवाटीची वस्ती असून कामे करणे कठीण आहे. सिवेज लाइनच्या कामाची पाहणी व नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली. यात थोडाफार वादविवाद झाला. मात्र, ही बाब चालायचीच. माझा कुणावरही रोष किंवा नाराजी नाही. सिवेज लाइनचे काम लवकरात लवकर पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 
- राजेश घोडपागे, नगरसेवक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, citizen, corporate, fight