महाविकास आघाडीचा महालमध्ये जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यातून मंगळवारपासून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत.

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची उद्या स्थापन होणार असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. 27) दुपारच्या सुमारास महाल येथील शिवाजी महाराज पुतळा परिसरात जल्लोष केला. यावेळी भगव्या झेंड्यासोबतच्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांच्या झेंडे उंचावून आनंद व्यक्त करण्यात आला. 

राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यातून मंगळवारपासून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत. आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन उद्या गुरुवारी (ता. 28) शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यांच्यासोबत निवड झालेले मंत्रीही शपथ घेतील. याचा जल्लोष करण्याच्या उद्देशाने बुधवारी दुपारी तीनला महाल परिसरात तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आलेत. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, नगरसेवक किशोर कुमेरिया यांच्यासह शहरातील इतर नेत्यांचा समावेश होता. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी झेंडे उंचावून जल्लोष केला. महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद साजरा केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, congress, ncp, shivsena