esakal | नागपुरातील कोरोनाचा रुग्णांची उपचारासाठी अमरावतीकडे धाव

बोलून बातमी शोधा

file image
नागपुरातील कोरोनाचा रुग्णांची उपचारासाठी अमरावतीकडे धाव
sakal_logo
By
सुधीर भारती -सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोविड-१९ चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेकांजवळ पैसा आहे, पण ते जीव वाचवू शकत नाहीत. साहेब, उपचारासाठी पैसा खर्च करण्याची ऐपत आहे, पण जीव नाही वाचवू शकलो, अशी खंत नागपूर येथील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी अमरावतीत व्यक्त केली.

नागपुरात कोविडने थैमान घातले असून, बहुतांश शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालये हाउसफुल्ल झालीत. तेथे गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी पैसे खर्च करण्याची तयारी असतानाही ऑक्‍सिजनचे बेडही उपलब्ध नाहीत. त्यामुळे बरेच जण अमरावती शहरात उपचारासाठी धाव घेत आहेत. आठवड्यात असे पन्नासच्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्ण शहरात दाखल झालेत. रविवारी नागपूर शहरातील एका ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेला तिच्या नातेवाइकांनी नागपुरात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. रात्री सव्वाआठच्या सुमारास ही महिला येथे आल्यानंतर बोलतसुद्धा होती. परंतु, योग्यवेळी उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. त्यातच नागपूर ते अमरावती जवळपास अडीच तास प्रवासात गेले. अमरावतीच्या इर्विनमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांतच या महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

महापालिकेच्या व्हॅनमधून नातेवाइकांच्या उपस्थितीत रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. असाच नागपूर ग्रामीण भागातील एक रुग्ण कोरोनाबाधित पुरुष (वय ५६) शहरातील खासगी कोविड रुग्णालयात रविवारी रात्रीच दाखल झाला. त्याचाही काही तासांतच मृत्यू झाला. त्याच्यावर सोमवारी (ता. १२) अमरावतीतच नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले.

गत पाच दिवसांपासून कोविड संबंधित व्यवस्थेवर ताण पडतो. डॉक्‍टर व कर्मचारी तेवढेच आहेत. त्यामुळे ताण निश्‍चितच वाढतोय. रुग्ण कोणत्याही जिल्ह्यातील असो, उपलब्ध व्यवस्थेत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती