फायरिंग! एमडी ड्रग्ज विक्रीचा वाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

पापाने पप्पूवर पिस्तूल उगारली. त्यानंतर हवेत फायर करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

नागपूर : शहरातील कुख्यात एमडी तस्कर पापा खान याने गणेशपेठमध्ये ड्रग्ज विक्रीच्या वादातून पप्पू शेखवर पिस्तूल उगारली आणि एक गोळी हवेत झाडली. या घटनेनंतर पप्पू आणि त्याच्या मित्रांनी पापाची चांगली धुलाई केली. त्याचा जबडा तोडल्यानंतर तो त्यांच्या तावडीतून निसटून पळून गेला. ही घटना गुरुवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ड्रग्ज तस्कर पापा वसीम खान (रा. मोठा ताजबाग) हा गेल्या काही दिवसांपासून एमडी ड्रग्ज तस्करी करीत होता. 2015 ते 2017 या दरम्यान पापा हा तडीपार होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याला गुन्हे शाखेने अमली पदार्थ विक्री करताना अटक केली होती. तो नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर ताजबागमधील अबूच्या गॅंगमध्ये सामील झाला आणि पुन्हा ड्रग्ज विक्रीत सक्रीय झाला. त्याने स्वतःचा ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून त्याला गणेशपेमधील काही ग्राहक मिळाले होते. मात्र, गणेशपेठमध्ये ड्रग्ज विकण्यास पप्पू शेख आणि त्यांच्या मित्रांनी विरोध केला. 5 डिसेंबरला मध्यरात्री तो दुचाकीने गणेशपेठमधील गणेश चौकात आला. त्याने एमडी विक्रीसाठी फिल्डिंग लावली. मात्र, पप्पू शेखने त्याला ड्रग्ज विक्रीस मनाई केली. त्यामुळे पापाने पप्पूवर पिस्तूल उगारली. त्यानंतर हवेत फायर करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

पापाची तोडफोड होईपर्यंत धुलाई

दरम्यान, पप्पूने मित्रांना बोलावले आणि पापाची तोडफोड होईपर्यंत धुलाई केली. त्यांच्या तावडीतून तो कसाबसा बचावला आणि पळून गेला. तो सीए रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झाला आणि काही तासांनंतर त्याने हॉस्पिटलमधून पळ काढल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेख पप्पू याच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस पापाचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, crime, firing, md drugs, pistol