बलात्काराला विरोध केल्यामुळेच युवतीचा खून; न्यायालयात गुन्हा सिद्ध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

या प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी आरोपी जीवनच्या मित्राची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश सय्यद यांनी जीवनला जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड सुनावला.

नागपूर : बलात्काराला विरोध केला म्हणून एका तरुणीचा गळा दाबून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जीवन ऊर्फ अशोक अजाबराव छपाणे (30) एकात्मतानगर, जयताळा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी स्वीटी (बदललेले नाव) हिला आईवडील आणि दोन बहिणी आहेत. आईवडील प्रतापनगर हद्दीत राहतात. स्वीटी ही लहानपणापासून तिच्या आजीकडे राहत होती. तिचे अकरावीपर्यंत शिक्षण झाले असून कॉलेज दूर पडत असल्याने तिने अर्ध्यावरच शिक्षण सोडले होते. तिची लहान बहीण ही गायत्रीनगर येथील एका शाळेत शिकत होती. लहान बहीण ही आरोपी जीवन ऊर्फ अशोक छपाणे याच्या स्कूल व्हॅनने येजा करीत होती. 

स्वीटी ही 11 सप्टेंबर 2015 रोजी पोळा असल्याने ती आईवडिलांकडे आली होती. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास आजीच्या घरून बेलाची पाने आणण्यासाठी गेली. त्याच दिवशी आरोपी जीवन हा स्वीटीच्या लहान बहिणीला दुचाकीने सोडण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी स्वीटीच्या आईने जीवनची विचारपूस केली. तुमची मुलगी रस्त्यात दिसल्याने तिला घरी आणून सोडले असे त्याने सांगितले. त्यातच तुमची मोठी मुलगी कुठे गेली, दिसत नाही अशीही आरोपी जीवनने विचारणा केली. त्यावर स्वीटी ही बेलाची पाने आणण्यासाठी आजीकडे गेली, अर्ध्या एका तासात येईल, असे स्वीटीच्या आईने सांगितले. त्यानंतर जीवन तेथून निघून गेला.

त्या दिवशी रात्री 8.30 वाजेपर्यंत स्वीटी घरी न आल्याने ती आजीकडे थांबली असेल असे तिच्या आईवडिलांना वाटले. इकडे जीवनने स्वीटीला रस्त्यात गाठले. चल घरी सोडून देतो, असे बोलून तिला दुचाकीवर बसविले. स्वीटीला मिहान परिसरातील इसासनीच्या जंगलात नेले. तेथे जीवनने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. स्वीटीने त्याला विरोध केल्याने त्याने तिचा गळा आवळून तिचा खून केला. 

स्वीटीचा मृतदेह आढळला 
16 सप्टेंबर रोजी स्वीटीचा मृतदेह काही लोकांना दिसून आला. जवळच शाळेचे दप्तर पडले होते. सोनेगाव पोलिसांना ही माहिती समजताच पोलिस घटनास्थळी गेले. दप्तरातील वह्यांवर स्वीटीच्या बहिणीच्या शाळेचे नाव लिहिले होते. त्यावरून प्रतापनगर पोलिस बहिणीच्या शाळेत गेले. त्यावेळी बहीण ही शाळेत आली होती, असे शिक्षकांनी पोलिसांना सांगितले. त्याचदिवशी रात्री 8.30 च्या सुमारास बहिणीची मैत्रीण ही तिच्या वडिलांसोबत स्वीटीच्या घरी आली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. 

खून केल्यावर काढला पळ 
स्वीटीचा खून केल्यानंतर जीवन घटनास्थळाहून पळून गेला. त्याने ही माहिती आपल्या एका मित्राला दिली आणि मित्राला घेऊन तो घटनास्थळी गेला. त्यावेळी स्वीटी ही मृत झाली होती. याप्रकरणी स्वीटीच्या आईच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी 376, 302 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात जीवनचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी आरोपी जीवनच्या मित्राची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश सय्यद यांनी जीवनला जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड सुनावला. आरोपीतर्फे ऍड. प्रभाकर भुरे यांनी तर सरकारतर्फे सहायक सरकारी वकील आसावरी परसोडकर यांनी बाजू मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, crime, murder, rape, court