टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

रविवारी सायंकाळच्या सुमारास अर्णव, त्याची बहीण व वडील कैलास हे घरी टीव्ही बघत होते. टीव्ही पाहत असताना अर्णव खेळण्यासाठी घराबाहेर पडला. घरातील अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला.

मेंढला (जि. नागपूर) : घरातील अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 8) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील मेंढला तालुक्‍यातील खरबडी येथे घडली. अर्णव (अंशू) कैलास घारेपडे (वय तीन वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 

रविवारी सायंकाळच्या सुमारास अर्णव, त्याची बहीण व वडील कैलास हे घरी टीव्ही बघत होते. टीव्ही पाहत असताना अर्णव खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मुलगा घरातच खेळत असल्याने कैलास टीव्ही पाहत बसले. मुलगा दिसत नसल्याने पाच ते दहा मिनिटांनी कैलास यांनी घराबाहेर येऊन बघितले. मात्र, अर्णव कुठेही दिसला नाही. त्यामुळे त्यांनी मुलाचा इतरत्र शोधाशोध केली; तरीही तो दिसला नाही. 

हेही वाचा - नागपूर जिल्हयात वाढला वाघाचा वावर

कैलास यांनी घरी आल्यानंतर पाण्याच्या टाकीकडे जाऊन बघितले असता अर्णव टाक्‍यात पडलेला दिसला. त्यांनी लगेच अर्णवला टाक्‍यातून बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे नेले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे यांनी अर्णवला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जलालखेडा येथील शवविच्छेदन गृहात नेण्यात आला. अर्णव हा घरात सर्वांचा लाडका होता. त्याच्या मृत्युमुळे शोककळा पसरली आहे. 

असे का घडले? - पतीने कवटाळले मृत्यूला; "छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : Death of drowning in tank