डॉन आंबेकरचा आणखी एक कारनामा उघड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

-मुंबईच्या व्यापाऱ्याची 1 कोटीने फसवणूक
- 25 लाखांची खंडणीही मागितली

नागपूर : स्वयंघोषित डॉन संतोष आंबेकरचा आणखी एक कारणामा उघडकीस आला आहे. बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने मिळवून देण्याची थाप मारून त्याने मुंबईच्या व्यापाऱ्याला एक कोटीचा गंडा घातला. शिवाय त्यालाच धमकावून 25 लाखांच्या खंडणीचीही मागणी केली. मुंबईकर व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून आंबेकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध लकडगंज ठाण्यात फसवणूक व खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

श्‍यामराव मानकुमरे असे तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मुंबईत व्यवसाय आहे. आंबेकरने साथीदारांच्या मदतीने त्याला हेरले आणि त्याच्यावर जाळे फेकले. आंबेकरच्या पंटरने मानकुमरेची भेट घेतली. कस्टमने जप्त केलेले सोने कमी किमतीत खरेदी करतो. त्यानंतर थोडे जास्त पैसे घेऊन बाजारभावापेक्षा कमी दराने त्याची विक्री करतो, अशी बतावणी केली. आंबेकर गुन्हे जगतातील मोठे प्रस्थ आहे, यामुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचेही सांगितले.
या आमिषाला बळी पडून व्यापाऱ्याने व्यवहाराची तयारी दर्शविली. ठरल्याप्रमाणे व्यापाऱ्याने संतोषला एक कोटी दिले. परंतु, संतोषकडून सोन्याची खेप मात्र पोहोचविण्यात आली नाही. फसगत झाल्याचे लक्षात येताच मानकुमरे नागपुरात आले. संतोषच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. पैसे परत मागताच संतोष भडकला. पैसे देण्यास नकार दिला. परत जाताना वाटेत अपघात घडवून ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून आणखी 25 लाखांची खंडणी मागितली. भीतीपोटी मानकुमरे शांत होते. नागपूर पोलिसांनी संतोषविरुद्ध कारवाईचे पाश आवळल्याची माहिती मिळताच मानकुमरेलाही हिंमत मिळाली. शनिवारी लकडगंज ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संतोषला दहा दिवसांचा पीसीआर
संतोषविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. गुजरात येथील एका भंगार व्यापाऱ्याची एक कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी सोनेगाव पोलिसांनी संतोषविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सोनेगाव पोलिसांनी न्यायालयातून प्रोडक्‍शन वॉरंट मिळवून संतोष आणि त्याचा साथीदार अरविंद पटेलला ताब्यात घेतले. दोघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, don santosh ambekar, cime