घरातील कचरा आता रस्त्यावर; नागरिकांची सहनशीलता संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

कचरा उचल करण्यासाठी वाहनेही अपुरी आहेत. याचा फटका सध्या शहराला बसत असून, नागपूरकर याप्रकारामुळे अक्षरक्ष: वैतागले आहेत.

नागपूर : घरांमध्ये कचरा साठवून ठेवण्याची नागरिकांची सहनशीलता आता संपुष्टात आली असून कचरा रस्त्यांवर टाकला जात आहे. पाच दिवसांनंतरही अनेक भागात कचरा संकलनासाठी कचरागाडी न पोहोचल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व जय जवान, जय किसान संघटनेने आज कचऱ्याने भरलेल्या ट्रकसह महापालिकेवर धडक दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दुनेश्‍वर पेठे व जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी दोन दिवसांत शहर कचरामुक्त न झाल्यास महापालिकेसमोर कचरा टाकण्याचा इशारा आयुक्तांना दिला. 

शहरात कचऱ्याच्या विल्हेवाटीचा पेच कायम आहे. शहराच्या अनेक भागात नवी यंत्रणा सुरू झाल्यापासून कचरागाडी पोहोचली नाही. अशावेळी घरातील कचरा कुणाला द्यावा? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. घरात चार दिवसांपासून कचरा असल्याने ओल्या कचऱ्यास दुर्गंधी सुरू झाली. त्यामुळे आता घरातील कचरा रस्त्यांवर येऊ लागला आहे. परिणामी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे जमा झाले असून सुंदर शहर विद्रूप होत आहे. महापालिकेने शहरात बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांची नियुक्ती केली. मात्र, अजूनही कचरा विल्हेवाटीची गाडी रुळावर आली नाही. शहराचा कचरा होत असल्याने आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दुनेश्‍वर पेठे व जय जवान, जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात बजाजनगरातील व्हीएनआयटी रोडवरील कचऱ्याची उचल करून ट्रकमध्ये साठविण्यात आला. कचऱ्याच्या ट्रकसह नागरिकांनीही महापालिकेवर धडक दिली. आयुक्तांनी दोन दिवसांत शहरातील कचरा उचलण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात अरुण बनकर, मिलिंद महादेवकर, प्रशांत नगरारे, रवींद्र इटकेलवार, रिजवान शेख, ऋषीकेश जाधव, अविनाश शेरेकर, रुद्र धाकडे, मनीषा ठाकरे आदींचा समावेश होता. 

नगरसेवकही संतप्त 
कचऱ्याची उचल होत नसल्याने नागरिक नगरसेवकांना फोन करीत आहेत. त्यामुळे नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. एकीकडे नवी यंत्रणा असल्याने अनेक नगरसेवकांना संबंधित कंपनीचे कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती नाही. कुणाशी संपर्क साधावा, ही प्राथमिक माहितीही नगरसेवकांकडे नाही. नागरिक घरावर येत असल्याने नगरसेवक संतप्त झाले आहेत. अनेक दिवसांपासून कचऱ्याची गाडी न आल्याचे नगरसेवक संजय महाकाळकार यांनी नमूद केले. भाजप नगरसेवकांतही संताप व्यक्त केला जात आहे. 

पूर्वतयारीचा फज्जा 
महापालिका प्रशासनानेच 15 नोव्हेंबरपासून नवी यंत्रणा सुरू केली. त्यामुळे पूर्वतयारीची जबाबदारीही प्रशासनाची होती. परंतु पूर्वतयारीचा फज्जा उडाल्याचे एकूण चित्र आहे. शहराचा अभ्यास करून दोन्ही कंपन्यांकडून व्यवस्था करणे अपेक्षित होते. परंतु, दोन्ही कंपन्यांनी त्याला गांभीर्याने घेतलेले नाही. कर्मचारी भरतीप्रक्रियाही वादात आली.  एकूणच यंत्रणा बदलताना खबरदारी घेण्यात आली नसल्याचेच स्पष्ट झाले. 

टोल फ्री क्रमांकावर प्रतिसादही नाही 
शहराचे दोन भाग करण्यात आले असून एका भागात धंतोली, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर झोनचा समावेश आहे. या भागातील नागरिकांसाठी 18002677966 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. शहराच्या दुसऱ्या भागात गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर, मंगळवारी झोनचा समावेश असून येथील नागरिकांना 18002662990 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. परंतु यावर प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेक नागरिकांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, home waste now on the road, nmc