आला रे आला! बिबट्या अंबाझरीत, ड्रोनने शोधाशोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कर्मचाऱ्यांनी दिवसभर बिबट्याची शोधाशोध केली. मात्र, तो कुठेच आढळून आला नाही. खबरदारी म्हणून वनविभागातर्फे सध्या या परिसरात पिंजरे लावण्यात आले आहे. 

नागपूर : सध्या एक वाघ मिहान परिसरात ठाण मांडून बसला असतानाच आता बिबट्याही शहरात घुसला आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा भागातील औद्योगिक परिसराला लागून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये गवत कापण्यासाठी गेलेल्या मजुरांना तो आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. खरबदारीचा उपाय म्हणून वनविभागाने शेजारी असलेल्या स्टेट बॅंक कॉलनी व वासुदेवनगरच्या सभोवताल बॅरिकेड्‌स लावले आहेत. 

वाघ, बिबट्या शहराच्या सभोवताल असलेल्या गावांमध्ये फिरू लागल्याने सध्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे. अलीकडेच एक वाघ मिहान परिसरातील एन्फोसिस कंपनीच्या शेजारी वास्तव्यास आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने येथे कॅमेरेसुद्धा लावले आहेत. त्यापैकी एक दिवस तो कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून तो अद्यापही आढळला नाही. तो नेमके कुठे लपून बसला याचा शोध घेतला जात आहे. बुधवारी सायंकाळी बिबट्याचे एक बछडा पाटणसावंगीतील एक विहिरीत पडला होता. त्याला वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडले आहे. 

मात्र, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजाताच्या सुमारास अंबाझरीला तलावाला लागून असलेल्या बायोडार्व्हसिटी पार्कजवळ गवतामध्ये बिबट्या आढळला. याच परिसरात असलेल्या लिटील वूड येथे अलीकडेच महामेट्रोतर्फे वृक्षारोपण केले होते. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वनमजूर येथे गवत कापायला गेले होते. त्यांना बिबट्या दिसताच काम सोडून ते पळाले. तत्काळ याची वनविभागाला सूचना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिवसभर बिबट्याची शोधाशोध केली. मात्र, तो कुठेच आढळून आला नाही. खबरदारी म्हणून वनविभागातर्फे सध्या या परिसरात पिंजरे लावण्यात आले आहे. 

इन्फ्रारेड ड्रोनने टेहाळणी 
दिवसभर माग काढल्यावर तसेच ड्रोन कॅमेराचा वापर केल्यानंतर बिबट्या आढळला नाही. त्यामुळे आता रात्रीच्या अंधारात बिबट्यासाठी शोधाशोध सुरू होती. याकरिता रात्रीच्या अंधारात दिसणारे इन्फ्रारेड ड्रोनचा वापर केला जात आहे. राज्यात प्रथमच अशा ड्रोनचा वापर केला जात आहे. 

येथे राहणाऱ्यांनी राहावे सतर्क 
बायो डार्व्हसिटीला लागून वासुदेवनगर, स्टेटबॅंक कॉलनी, जलतरण सोसायटीसह औद्योगिक परिसरातील हरिगंगा, सोनगाव व वाडी अशा वस्त्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, leopard, ambazari