वाघ गेला, अंबाझरीत बिबट्या आला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

जैवविविधता उद्यान भाग-1 कक्ष क्रमांक 797 परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजतादरम्यान प्रभातफेरीसाठी आलेल्या पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या पावलांचे ठसे (पगमार्क) आढळून आले.

नागपूर  : मिहानमध्ये वाघ फिरत असल्याची वार्ता पुढे येताच नागपूरकरांमध्ये चिंता वाढली होती. एकीकडे वाघाला बघण्याची उत्सुकता, तर दुसरीकडे मनात काळजी. वाघ मिहानमध्ये आला आणि निघूनही गेला. या वाघाने कोणालाही इजा पोहोचवली नाही. अवघे दोन दिवस उलटत नाही, तोच आता चक्क अंबाझरी परिसरात गुरुवारी (ता. 28) बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याची चर्चा होती. 

अंबाझरी परिसरात अचानक बिबट कुठून आला, कसा आला, वाघाप्रमाणेच तोही परत जाईल का? की बिबट्यामुळे भीतीचे वातावरण पसरेल, ही बाब लक्षात घेत वनविभागाने उद्यान तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात अंबाझरी उद्यानातील तलावालगत वनविभागाचे 750 हेक्‍टर राखीव वनक्षेत्र आहे. या क्षेत्रात "अंबाझरी जैवविविधता उद्यान' सुरू करण्यात आले आहे. या जैवविविधता उद्यान भाग-1 कक्ष क्रमांक 797 परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजतादरम्यान प्रभातफेरीसाठी आलेल्या पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या पावलांचे ठसे (पगमार्क) आढळून आले. वनविभागाला सदर माहिती मिळताच पथक तेथे पोहोचले. पावलांचे ठसे पुसट स्वरूपात आढळले. बारकाईने निरीक्षण करण्यात आले. यात बिबट्याच्या पावलाचे ठसे असल्याची शक्‍यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली. यासंबंधाने दोन पथके तयार करण्यात आली. संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र, इतरत्र कुठेही बिबट्याच्या खाणाखुणा आढळल्या नाहीत. तरीसुद्धा अंबाझरी जैवविविधता उद्यानात गस्त राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला आहे. उद्यानातील दर्शनी भागात फलकाद्वारे काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

सुरक्षेसाठी तीन दिवस उद्यान बंद 
मिहान-एससीझेड प्रकल्पात वाघाचा वावर पुन्हा-पुन्हा दिसू लागला असल्याने या भागात सुरक्षा वाढविण्यात आली होती. त्याच धर्तीवर अंबाझरी परिसरात बिबट आणि मानव यांच्यात संषर्घ होऊ नये तसेच पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता वनविभाग अधिकाऱ्यांनी अंबाझरी उद्यान तीन दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, leopard, tiger