नागपूरचे महापौर करणार गांधीगिरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

जपानी उद्यानात नागरिकांकडून शुल्क वसुली केली जाते. यास या परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

नागपूर : सेमिनरी हिल्स येथील जपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात येत असलेले शुल्क रद्द न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानापुढे गांधीगिरी करणार, असा इशारा आज महापौर संदीप जोशी यांनी दिला. त्यामुळे वनखाते चांगलेच अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील कुठल्याही उद्यानात दररोज सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींकडून शुल्क घेण्यात येत नाही. मात्र, जपानी उद्यानात नागरिकांकडून शुल्क वसुली केली जाते. यास या परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. याबाबत येथील नागरिकांनी महापौरांकडे तक्रारही केली. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी आज उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ला यांना निवेदन दिले. जपानी उद्यानातील नागरिकांकडून शुल्क घेऊ नये. ही वसुली तत्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा येत्या 20 डिसेंबरला सकाळी सातला मुख्यमंत्र्यांच्या निवासापुढे नागरिकांसह गांधीगिरी आंदोलन करू, असा इशारा महापौर जोशी यांनी निवेदनातून दिला.

जपानी उद्यानात येणाऱ्यांकडून येत्या 18 डिसेंबरपर्यंत शुल्क घेणे बंद करा, असेही निवेदनात त्यांनी नमूद केले आहे. निवेदन देताना त्यांच्यासोबत नगरसेविका प्रगती पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, लाफ्टर क्‍लबचे किशोर ठुठेजा आदी उपस्थित होते. 

नागरिकांसह आंदोलन

या उद्यानात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी "वॉक अँड टॉक विथ मेयर' उपक्रमांतर्गत 25 नोव्हेंबरला महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार मांडली होती. वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे तसेच त्यानंतरही शुल्क बंद झाल्यास नागरिकांसह आंदोलन करण्याचे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, mayor, gandhigiri, nmc, japani garden, fees