esakal | मेडिकलची हरवली "गस्त'
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मेडिकलची हरवली "गस्त'

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : सायकलवरून गस्त घालून चोरट्यांवर अंकुश ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम कधीकाळी पोलिसांमार्फत वस्त्या-वस्त्यांमध्ये राबवला जायचा. पुढे दुचाकी वाहने आली. आता चारचाकी वाहनातून गस्त घातली जाते. मात्र, गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. दीड वर्षापूर्वी मेडिकल परिसरात नेपाळी गोरखांच्या धर्तीवरचा "गस्त' घालून परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्याचा उपक्रम तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सुरू केला होता. मेडिकल परिसरात 24 तासात 3 वेळा गस्त घालून मेडिकल-सुपरच्या सुरक्षेची जबाबदारी पेलवण्याचे आव्हान गस्त पथकाने स्वीकारले होते. परंतु, ही गस्त हरवली आणि पथकही संपुष्टात आले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत परिसरात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली.
पंचवीस वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी कोणताही सुरक्षा यंत्रणा नव्हती. केवळ मेडिकलच्या वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून नेपाळी गुरखासह 32 सुरक्षारक्षक तैनात होते. मेडिकलमध्ये होणाऱ्या सर्व घटनांसह वस्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी ते 32 सुरक्षारक्षक करायचे. गेल्या दोन दशकात 32 पैकी 22 सुरक्षारक्षक निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागा भरल्या नाही. काळानुसार खासगी सुरक्षारक्षकांना तैनात करण्याचा नवा अजेंडा शासनाने सुरू केला. मेडिकलसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्‍टरांची सुरक्षा हाच सुरक्षारक्षक नियुक्तीचा उद्देश आहे. मात्र, नियुक्त सुरक्षारक्षकांना अतिरिक्त जबाबदारी दिली जात नाही. दोन वर्षांपूर्वी मेडिकलमधील मुलींच्या वसतिगृहातील वाहने जाळण्यापासून तर चिरीमिरी करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर अंकुश आणण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी 200 एकरच्या परिसरात महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच खासगी सुरक्षा एजन्सी यांच्यातील काही सुरक्षारक्षकांचे वेगळे पथक तयार केले. त्याची जबाबदारी आरोग्य विभागाचे प्रतिनियुक्तीवरील डॉ. मुरारी सिंग यांच्याकडे दिली. या पथकांमार्फत दररोज तीनवेळा डॉ. सिंग यांच्यासह सुरक्षारक्षकांचे पथक मेडिकलच्या परिसरात फेरफटका मारायचे. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज पाच ते सहा मद्यपींसह इतर चोरट्यांनाही जेरबंद करण्यात आले.
डॉ. सिंग यांची बदली
डॉ. सिंग यांची प्रतिनियुक्ती संपली आणि सात महिन्यांपासून "गस्त' घालण्याची मोहीम बंद पडली. ही मोहीम सुरू करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने स्वीकारणे गरजेचे होते. परंतु, त्यांना प्रशासकीय कामकाज सांभाळण्यात आणि काही प्रमाणात अर्थव्यवहार सांभाळण्यात रस आहे. अशा उदासीन धोरणामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर, स्वच्छता निरीक्षकांवर हल्ला तसेच इतरही अनुचित प्रकार घडत आहेत. चोऱ्या वाढल्या, वॉर्डात सारे खासगी पॅथॉलॉजीचे एजंट शिरले आहेत. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे धागेदोरे गुंतले असल्याची जोरदार चर्चा असल्याचे येथील संघटना असलेल्या इंटकमध्ये पसरली आहे.  

loading image
go to top