नागपूर-नागभीड रेल्वे सेवा बंद, अनेकांनी केला अखेरचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवून प्रवासाची सोय होणे गरजेचे आहे. यासोबतच बस भाडे वाजवी असावे. गाडी बंद होतानाच तत्काळ दुसऱ्या दिवशीपासून एसटीच्या फेऱ्या सुरू व्हाव्या.

उमरेड, कुही, भिवापूर, (जि. नागपूर) : नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेसेवा आजपासून बंद झाली. या मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होणार आहे. नागभीडपर्यंतच्या नागरिकांसाठी सोयीची असलेली ही गाडी बंद झाल्याने याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होणार असल्याने गाव-खेड्यांना जोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी अखेरच्या प्रवासात करण्यात आली. 

नॅरोगेजवरून धावणाऱ्या अखेरच्या गाडीला अनेकांनी कायमचा निरोप दिला. ब्रॉडगेज झाल्यावर पुन्हा रेल्वेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करू अशी आशा व्यक्त केली. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी व नागरिकांनी रेल्वेच्या गार्ड व लोकोपायटलचे स्वागत केले व रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. उमरेड येथे रेल्वे गाडीचे स्वागत करीत कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक प्रामुख्याने उपस्थित होते. मोठ्या संख्येने उमरेडवासी रेल्वेस्थानकावर पोचले होते. कुही रेल्वे स्थानकावर शंभर वर्षे सेवा दिल्याबद्दल गाडीचे पूजन करण्यात आले. रेल्वे स्टेशन मास्टर व लोक पायलट आभार व्यक्त केले. यावेळी मांढळ बाजार समितीचे उपसभापती महादेवराव जिभकाटे, विलास राघोर्ते, आकाश लेंडे, सचिन घुमरे, पंकज देशमुख, देवीदास ठवकर, प्रतीक ढबाले, अमित ठवकर, रामकृष्णा डहाके, कैलास चौधरी, लांजेवार यासह युवक कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 
 

विद्यार्थ्यांची असुविधा होणार
भिवापूर रेल्वे स्थानकावर दुपारी दोन वाजता नागपूवरून नागभीडला व नागभीडवरून नागपूरला जानाऱ्या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या इंजिनला हार घातले. कर्मचाऱ्यांचे पुष्पगच्छ, मिठाई व भेटवस्तू देत सत्कार केला. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, डॉ. संतोष राऊत, डॉ. अजय अग्रवाल, तौफिक पटेल, डॉ. प्रदीप गुप्ता, अनिल खोब्रागडे, देवा वानखेडे, डॉ. वर्षा गुप्ता, राजू उरकुडे, नरेश खांडेकर, लक्ष्मीनारायण कुछवाह, स्टेशन मास्टर अरविंद कुमार, प्रशांतकुमार व भिवापूरकर मोठ्या संख्येने हजर होते. ब्रॉडगेजच्या कामामुळे बंद झालेल्या ही रेल्वे गाडी उमरेड मतदारसंघातील उमरेड, भिवापूर, कुही तालुक्‍यातील व्यापारी, सर्वसामान्य, शेतमजूर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची असुविधा होणार आहे हे तेवढेच खरे. 

प्रवाशांची मागणी; हे कराच 
रेल्वेगाडी बंद झाल्याने पर्यायी व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन करावी. एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवून प्रवासाची सोय होणे गरजेचे आहे. यासोबतच बस भाडे वाजवी असावे. गाडी बंद होतानाच तत्काळ दुसऱ्या दिवशीपासून एसटीच्या फेऱ्या सुरू व्हाव्या. यामुळे विद्यार्थी, व्यापारी, शेतमजूर यांची गैरसोय होणार नाही. एसटीच्या पासेस कमी दरात पासेस उपलब्ध करून द्यावात. विशेष म्हणजे कुही-मोहदरा-ब्राम्हणी-उमरेड, उमरेड-ठाणा कारगाव-तास-भिवापूर- निलजफाटा-नागभीड या बससेवा सकाळी 9 वा. तर नागपूर-उदासा-ब्राम्हणी, सायं 5 वा. नागपूर-उदासा-ब्राम्हणी सकाळी 8 वा., उमरेड-ब्राम्हणी-मांढळ, सायं. 6 वा., उमरेड-ब्राम्हणी-मांढळ या मार्गावर वेळेत बस फेऱ्या सुरू व्हाव्यात. 

नागपूर-नागभीड रेल्वे सेवा बंद झाली आहे. यामुळे ब्रॉडगेज गाडी धावेपर्यंत प्रवाशांना रेल्वे सेवा मिळणार नाही. यामुळे मतदारसंघातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे. एसटीच्या गाड्या लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. 
- राजू पारवे, आमदार, उमरेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Nagbhid railway closed