नवोदय बॅंक घोटाळा : गांधी बिल्डरला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

बालकिसन गांधीने तब्बल 8 कोटी 46 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. गांधी हा ग्लॅडस्टोन समूहाचा भागीदार आहे.

नागपूर : नवोदय बॅंक घोटाळ्यात आणखी नवे वळण आले आहे. येथील घोटाळेबाज बालकिशन मोहनलाल गांधी (वय 48, रा. प्लॉट क्र. 131, लाडीकर लेआउट, मानेवाडा रोड, नागपूर) नावाच्या बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेने खामगावातून अटक केली. या बिल्डरने वेगवेगळ्या आठ फर्म दाखवून नवोदय बॅंकेची तब्बल साडेआठ कोटींनी फसवणूक केली. पोलिसांनी आज बुधवारी गांधीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गांधीला दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील 38.75 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी माजी आमदार आणि बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह बॅंकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. 2010 ते 2015 या कालावधीत नवोदय बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या ठरावीक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले. तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेऊन संचालक मंडळाने कर्जदारांना कर्ज दिले होते. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बॅंकेतून पैशांची उचल केली. तसेच रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी बॅंकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले होते. संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांनी या कालावधीत 38 कोटी 75 लाख 20 हजार रुपयांचा घोटाळा केला. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष परीक्षक (भंडारा) श्रीकांत सुपे यांनी केलेल्या अंकेक्षणानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. सुपे यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मे 2019 महिन्यात बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. माजी आमदार अशोक धवड या कालावधीत बॅंकेचे अध्यक्ष होते. 

साळ्याच्या घरी होता लपून 
बालकिशन गांधी याने नवोदय बॅंकेला जवळपास साडेआठ कोटींनी चुना लावल्यानंतर खामगावातील मेहुणा जगदीश मंत्री याच्या घरी लपून बसला होता. पोलिस निरीक्षक प्रशांत माने यांच्या पथकाने खामगावातून त्याला अटक केली. गांधी हा ग्लॅडस्टोन समूहाचा भागीदार आहे. 2011 मध्ये गांधीने नवोदय बॅंकेत बनावट कागदपत्रे सादर करीत मे. मित्तल बिल्डर्स, मे. क्‍वालिटी ट्रेडर्स या कंपन्यांच्या नावाने प्रत्येक 60 लाखांचे कर्ज घेतले. बालकिसन गांधीने तब्बल 8 कोटी 46 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, navoday bank scam, gandhi builder arrested