नागपूर : नवनिर्वाचित आमदारांना धडकी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

निवडणुकीत झालेल्या चुका सर्वच पक्षांना ठाऊक झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा निवडणूक झाल्यास चुकांची पुनरावृत्ती करण्याची चूक कोणीच करणार नाही.

नागपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने नवनिर्वाचित आमदारांमध्ये चांगलीच धडकली भरली आहे. अल्प मतांच्या फरकांनी तसेच प्रथमच निवडून आलेल्यांना पुन्हा निवडणूक लढायची वेळ आल्यास आपले काय होईल याची चिंता सतावत आहे. 

राज्यात पार पडलेल्या निवडणुकीत युतीला बहुतम मिळाले असले तरी भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या भांडणावर अखेरपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे भाजपने सत्ता स्थापनेचा दावा सोडून दिला. या दरम्यान, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याला पाठिंबा देईल अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. त्यांनीही पुरेसा वेळ नसल्याने सत्तेचा दावा करता येणार नाही असे कळविल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. ती मान्य करण्यात आली आहे. अद्यापही युती आणि आघाडीमध्ये एकमत होण्याचे चिन्ह नाही. त्याची शक्‍यातही फारसी दिसत नाही. प्रत्येकाला आपल्या पक्षाची चिंता लागली आहे. कोणीही कोणाला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार नाही. या सर्व घडामोडींमध्ये नवनिर्वाचित आमदारांचे सॅंडविच होत आहे. फोडाफाडी होऊ नये याकरिता कॉंग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरमध्ये ठेवले. शिवसेनेचे आमदारसुद्धा मुंबईत एका हॉटेलमध्ये बंदिस्त आहेत. आता त्यांच्यावर सत्ता कोणालाही द्या मात्र आम्हाला पाच वर्षे आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण करू अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे प्रथमच पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून निवडून आले. यंदा त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. दुसरीकडे दक्षिण नागपूरमध्ये आमदार मोहन मते आणि कॉंग्रेसचे उमेदवार किरण पांडव यांच्याच अतिशय चुरशीची लढत झाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. यात मोहन मते विजयी झाले. मध्य नागपूरमध्ये बंटी शेळके आणि आमदार विकास कुंभारे यांच्यात काट्याची लढत झाली. 
उमरेडमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी दोनवेळा आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांना पराभूत केले. रामटेकमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशीष जयस्वाल स्वबळावर निवडून आले आहेत. 

चिंता वाढली 
तिकीट मिळवण्यापासून तर निवडणूक जिंकेपर्यंत आमदारांना अनेक दिव्यातून जावे लागते. कोट्यवधींचा चुराडा होतो. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक आमदार प्रथमच निवडून आले आहेत. यातही काही जण अत्यल्प मतांनी विजयी झाले आहेत. पुन्हा निवडणूक झाल्यास कसे होईल याचीच चिंता त्यांना सतावत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, new elected mla