35 वर्षांनंतर वाढीव नुकसानभरपाई लवाद कार्यरत 

निखिल भुते
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - नागपूर सुधार प्रन्यासने संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्यात वाढीव नुकसानभरपाई देण्याची विनंती करणाऱ्या एका याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे तब्बल 35 वर्षांनंतर निर्णय देत वाढीव नुकसानभरपाई लवाद कार्यरत होणार आहे. 

नागपूर - नागपूर सुधार प्रन्यासने संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्यात वाढीव नुकसानभरपाई देण्याची विनंती करणाऱ्या एका याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे तब्बल 35 वर्षांनंतर निर्णय देत वाढीव नुकसानभरपाई लवाद कार्यरत होणार आहे. 

नागपूर सुधार प्रन्यास ऍक्‍टमधील सेक्‍शन 62 नुसार मूळजमीनमालक वाढीव नुकसानभरपाईसाठी लवादकडे अर्ज करू शकतो. या लवादमध्ये जिल्हा न्यायाधीश दर्जाची व्यक्ती, नगरविकास विभागाचे सहसंचालक आणि सुधार प्रन्यासचा नगरविकास अधिकारी यांचा समावेश असतो. मात्र, गेल्या 35 वर्षांपासून लवाद कार्यरत नव्हते. यामुळे अनेकांनी वाढीव नुकसानभरपाईसाठी केलेले अर्ज प्रलंबित होते. यापैकी एक असलेले पुरुषोत्तम तारेकर यांची पाचपावली येथील 10 एकर जागा 1982 मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित केली. त्यासाठी तारेकर यांना नुकसानभरपाईदेखील देण्यात आली. परंतु, तारेकर यांनी वाढीव नुकसानभरपाईसाठी लवादकडे अर्ज केला. तेव्हापासून आतापर्यंत तारेकर यांचा अर्ज प्रलंबित होता. यामुळे अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत चांगलेच ताशेरे ओढले. तसेच सहा आठवड्यांच्या आत लवाद पूर्ण करण्याचा आदेश दिला. 

यानुसार अखेर 7 ऑगस्ट 2017 रोजी लवाद तयार करण्यात आले. यापूर्वी लवादमध्ये केवळ जिल्हा न्यायाधीश दर्जाची व्यक्ती होती. पण, इतर दोन अधिकारी नसल्यामुळे त्यांना वाढीव नुकसानभरपाईसाठी आलेले अर्जांवर निर्णय घेता येत नव्हता. परिणामत: अनेकांचे अर्ज लवादपुढे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता नगरविकास विभागाचे सहसंचालक आणि सुधार प्रन्यासचा नगरविकास अधिकारी यांचा समावेश लवादात करण्यात आला आहे. 35 वर्षांनंतर का होईना पण लवाद कार्यरत होणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याप्रकरणी तारेकर यांच्यातर्फे ऍड. नितीन हिवसे आणि ऍड. मीना हिवसे यांनी बाजू मांडली. 

Web Title: nagpur news court